क्षयरोग नियंत्रण कामगिरीत नवी मुंबई राज्यात व्दितीय क्रमांकाने मानांकित
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात व्दितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. या कार्याची दखल घेत राज्य क्षयरोग नियंत्रण कार्यालयामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम समुहाचा यशदा, पुणे येथे सहसंचालक, आरोग्य सेवा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
क्षयरोग अर्थात टिबी कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांची 80 विभागांत विभागणी करण्यात आली असून सन 2023 मध्ये केलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर आढाव्यात नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने केलेल्या कामाबद्दल संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या टीबी कार्यक्रमात उत्कृष्ट कामाबद्दल व्दितिय क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले. केंद्र शासनाच्या सेंट्रल टीबी डिव्हिजन, नवी दिल्ली यांनी देखील नमुंमपाच्या कामाची दखल घेतली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त मा.श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम नमुंमपा कार्यक्षेत्रात 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 3 सार्वजनिक रुग्णालये व 2 माता बाल रुग्णालयामार्फत उपक्रम राबविले. तसेच सन 2023 मध्ये नमुंमपा अंतर्गत सर्व खाजगी प्रयोगशाळा, तपासणी केंद्र, रुग्णालये व एक्स रे तपासणी केंद्रांशी समन्वय साधून क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची उद्दिष्टपूर्ती करणेकरिता सहकार्य प्राप्त करुन घेतले.
क्षयरोगाचे निर्मुलन करणेकरिता शासकिय व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, लॅब्स इत्यादींनी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस कळविणे आवश्यक आहे.
नमुंमपा, खाजगी संस्था व नागरिक एकत्रित आल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नमुंमपाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्याकरिता तसेच नवी मुंबई क्षयरोगमुक्त करणेकरीता खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
Published on : 18-03-2024 11:59:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update