महाराष्ट्र दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कामगार दिनाचे औचित्य साधून स्वच्छताकर्मींचा सन्मान
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करीत राष्ट्रगीत व तद्नंतर 19 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्र शासनाने अंगीकृत केलेले महाराष्ट्राचे राज्यगीत ध्वनीप्रसारित करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई तसेच विभागप्रमुख, अधिकारी - कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनाप्रमाणेच आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनही असल्याचा विशेष उल्लेख करीत देशाच्या प्रगतीत कामगारांचे मोठे योगदान असल्याचे सांगत आयुक्त महोदयांनी आज कामगार दिनानिमित्त महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांचा सन्मान करताना आनंद होत असल्याचे सांगितले.
कामगार दिनाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात शहर स्वच्छतेत योगदान देणा-या प्रत्येक विभागातील एक स्वच्छताकर्मी अशा 8 स्वच्छताकर्मींना आयुक्त महोदयांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यामध्ये प्रतिभा निरवणे (बेलापूर), हिरू कडू (नेरूळ), आनंद पाटील (वाशी), मनिषा सरोदे (तुर्भे), अशोक पाटील (कोपरखैरणे), समीर पाटील (घणसोली), जगन्नाथ शिरवणकर (ऐरोली), दिपेश नायर (दिघा) या स्वच्छताकर्मींचा सन्मान करण्यात आला. नवी मुंबईच्या स्वच्छ सर्वेक्षणातील राष्ट्रीय मानांकनात स्वच्छता कामगारांचा सर्वात महत्वाचा वाटा असून त्यांच्या कामाप्रती आदरभाव व्यक्त करीत त्यांना सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस 30 एप्रिल ते 2 मे 2024 या कालावधीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्यालय इमारतीसमोर हुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ती बघण्यासाठी व विद्युत रोषणाई आणि प्रतिकृतीसमवेत सेल्फी काढण्यासाठी नागरिक मुख्यालय परिसराला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
Published on : 03-05-2024 10:17:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update