एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कार्यवाहीत 34.2 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त व 75 हजार दंडवसूली
स्वच्छतेप्रमाणेच प्लास्टिक प्रतिबंधावरही महानगरपालिकेचे बारकाईने लक्ष असून प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यावर तसेच एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यावर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भर देण्यात येत आहे. एकल वापर ’प्लास्टिक फ्री मार्केट’ या आयुक्त महोदयांच्या संकल्पनेनुसार सर्वच मार्केटमध्ये कार्यवाही केली जात असून नागरिकांना त्या ठिकाणी कापडी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध करुन दिला जात आहे.
प्लास्टिकचा मानवी जीवनाला व पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. याशिवाय प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबवून प्लास्टिक पिशव्यांचा व एकल वापर प्लास्टिकचा उपयोग आढळल्यास दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात येत आहे.
1 जुलै पासून 7 जुलैपर्यंतच्या आठवडयात 15 दुकाने / आस्थापना याठिकाणी एकल वापर प्लास्टिक आढळल्याने 75 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून 34 किलो 200 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा माल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये बेलापूर विभागात 4 दुकाने/आस्थापना यावर कारवाई करीत 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 8 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. नेरुळ विभागात 2 दुकाने / आस्थापना यावरील कारवाईतून 10 हजार दंड व 2.5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक् जप्त करण्यात आले आहे. घणसोली विभागात एका व्यावसायिकाकडून रु. 5 हजार दंड वसूली आणि 1 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिघा विभागातही एका व्यावसासिकाकडून 5 हजार दंडात्मक वसूली करण्यात आली आहे व 1.2 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
याशिवाय परिमंडळ 1 विभागाच्या भरारी पथकाने 4 दुकानदारांकडून 20 हजार रु. दंड वसूल केला आहे व 20 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक् जप्त केले आहे. तसेच परिमंडळ 2 विभागाच्या भरारी पथकाने 1.5 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्ती केली आहे आणि रु.15 हजार दंड वसूल केला आहे.
अशा प्रकारे एकूण 15 दुकाने/आस्थापना यांच्याकडून प्रतिबंधात्म्क प्लास्टिकचा वापर आढळल्याने रु 75 हजार दंडात्म्क रक्कम वसुली तसेच 34 किलो 200 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
नागरिकांनी ठरविल्यास विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार नाहीत, त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणाला होणारा प्लास्टिकचा धोका लक्षात घेऊन प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 09-07-2024 06:55:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update