*18 वर्षावरील नागरिकांच्या प्रिकॉशन डोसविषयी गतीमान कार्यवाहीचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश*
15 जुलैपासून कोव्हीड लसीचा प्रिकॉशन डोस शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत देण्यास केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरुवात झालेली आहे. 18 वर्षावरील नागरिकांना कोव्हीड लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका असून प्रिकॉशन डोस देण्यातही आघाड़ीवर राहण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची विशेष बैठक घेत जास्तीत जास्त लाभार्थी नागरिकांनी प्रिकॉशन डोस लवकरात लवकर घ्यावा याकरिता नियोजन करण्याचे निर्देश दिले.
कोव्हीड झाला तरी कोव्हीड लसीकरणामुळे त्याची तीव्रता कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोव्हीड अजून पूर्णत: संपलेला नाही हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध माध्यमांव्दारे लस संरक्षित होण्याचे महत्व पटवून देऊन प्रिकॉशन डोसच्या लसीकरणाला गती द्यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘कोव्हीड 19 लसीकरण अमृत महोत्सव’ अंतर्गत 15 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत 75 दिवसाच्या कालावधीत 18 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. आणखी एक चांगली बाब म्हणजे आता दुस-या डोसनंतर तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आता दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर लगेचच प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना प्रिकॉशन डोस घेऊन लस संरक्षित होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत तिन्ही रुग्णालये तसेच दोन माता बाल रुग्णालये आणि 23 नागरी आरोग्य केंद्रे यासह सेक्टर 5 वाशी येथील इएसआयएस रुग्णालय याठिकाणी प्रिकॉशन डोस मोफत उपलब्ध करून दिला जात असून नवी मुंबईतील लसीकरण केंद्रावरील व्यवस्था चांगली आहे. प्रिकॉशन डोससाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी गृह भेटी, मायकींग, सोशल माध्यमांव्दारे आवाहने अशा विविध बाबी उपयोगात आणाव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले.
18 वर्षावरील नागरिकांच्या प्रिकॉशन डोसची कार्यवाही करताना विशेषत्वाने 45 वर्षावरील नागरिकांना तसेच कोमॉर्बिडीटी असणा-या नागरिकांना प्रिकॉशन डोस दिला जाईल याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे 60 वर्षावरील नागरिकांकडेही प्राधान्याने लक्ष देऊन 100 टक्के उद्दीष्टपूर्ती लवकरात लवकर होईल याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, कोव्हीड 19 लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.
आत्तापर्यंत 13 लाख 81 हजार 987 नागरिकांनी पहिला डोस, 12 लाख 37 हजार 968 नागरिकांनी दुसरा डोस तसेच 1 लाख 13 हजार 037 नागरिकांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतलेला आहे. यामध्ये -
- आरोग्य कर्मी (HCW) – 34510 (पहिला डोस), 23105 (दुसरा डोस), 10241 (प्रिकॉशन डोस)
- पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) – 30883 (पहिला डोस), 22106 (दुसरा डोस), 10451 (प्रिकॉशन डोस)
- 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 100252 (पहिला डोस), 101503 (दुसरा डोस), 41851 (प्रिकॉशन डोस)
- 45 ते 60 वयोगटातील नागरिक – 245426 (पहिला डोस), 236070 (दुसरा डोस), 44067 (प्रिकॉशन डोस)
- 18 ते 45 वयोगटातील नागरिक – 844817 (पहिला डोस), 755316 (दुसरा डोस), 6427 (प्रिकॉशन डोस)
- 15 ते 18 वयोगटातील नागरिक – 81810 (पहिला डोस), 66266 (दुसरा डोस)
- 12 ते 14 वयोगटातील नागरिक – 44289 (पहिला डोस), 33602 (दुसरा डोस) घेतलेला आहे.
18 वर्षावरील नागरिकांचे दोन्ही डोस सर्वप्रथम पूर्ण करणारी तसेच 15 ते 18 वयोगटातील मुलांचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असून यामध्ये आरोग्याचे महत्व जाणणा-या नवी मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे कोव्हीडची तीव्रता कमी करणा-या कोव्हीड लसीचे संरक्षण मिळविण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी दुस-या डोसनंतर 26 आठवडे किंवा 6 महिने पूर्ण झाले असल्यास लगेचच आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन कोव्हीड लसीचा मोफत प्रिकॉशन डोस घ्यावा आणि लस संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 20-07-2022 10:49:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update