कोव्हीड-19 उपाययोजनांकरिता प्राथमिक शिक्षक संघटनेचा मदतीचा हात

संपूर्ण देशभरात कोरोना विरोधातील लढाई अत्यंत जिद्दीने लढली जात असून यामध्ये विविध घटक सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रकारची मदत करीत आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील शिक्षकवृंदानेही या लढ्यात आपलाही सहकार्याचा हात असावा यादृष्टीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, नवी मुंबई यांचे वतीने शिक्षकांना आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत महानगरपालिकेत कार्यरत आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांकडून जमा झालेल्या 2 लक्ष 79 हजार 221 इतक्या किंमतीच्या वैद्यकीय सुविधा साहित्याची वस्तुरूपातील मदत नवी मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आली. या साहित्यामध्ये 150 पी.पी.ई. किट, 125 वॉशेबल मास्क, 741 विविध स्वरूपाची ब्लँकेट्स यांचा समावेश आहे.
उत्तम संस्कारातून नवी पिढी घडविणा-या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला आदर्श आपल्या मदतीच्या कृतीतून समाजासमोर ठेवला असून या स्तुत्य उपक्रमाचे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी कौतुक केले. तसेच कोव्हीड - 19 उपाययोजनांमध्ये शिक्षक पार पाडीत असलेल्या विविध जबाबदारीच्या कामाबद्दल त्यांची प्रशंसा केली. याप्रसंगी शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन काळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. रूतिका संखे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नवी मुंबईचे अध्यक्ष श्री सांगरनाथ भंडारी, राज्य चिटणीस श्री संजय मोरे, खजिनदार श्री खुशाल चौधरी व सरचिटणीस श्री आत्माराम आग्रे उपस्थित होते.
Published on : 21-05-2020 08:00:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update