आता कोव्हीड 19 रुग्ण खाटांची माहिती एका क्लिकव्दारे डॅशबोर्डवर मिळणार

कोव्हीड 19 रुग्णांकरीता विविध उपाययोजना केल्या जात असताना नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णस्थितीची सहज माहिती उपलब्ध व्हावी तसेच कोव्हीड 19 बाधितांकरीता उपलब्ध असणा-या रुग्णालयांची माहिती आणि त्या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेसाठी वापरात असलेल्या बेड्सची संख्या व उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरिता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून "कोव्हीड 19 डॅशबोर्ड" उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी http:/nmmccovid19.in/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
एखाद्या व्यक्तीचा स्वॅब टेस्टींग अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या लक्षणांची तीव्रता बघून त्या रुग्णाला कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) अथवा डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल (डिसीएच) यापैकी कोठे उपचारार्थ दाखल करावयाचे व त्यासाठी कोठे जागा उपलब्ध आहे याबद्दलची माहिती या डॅशबोर्डव्दारे त्वरीत उपलब्ध होणार असून यामुळे कमीत कमी वेळेत रुग्णाला योग्य ठिकाणी दाखल करणे सोयीचे होणार आहे.
"कोव्हीड 19 डॅशबोर्ड" च्या मुख्यपृष्ठावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, बरे होऊन घरी परतलेल्या (डिस्चार्ज) व्यक्तींची संख्या, प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या व्यक्तींची संख्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या प्रदर्शित होणार आहे. ही आकडेवारी नियमितपणे अद्ययावत होणार आहे.
त्याचप्रमाणे या डॅशबोर्डच्या मुख्यपृष्ठावर कोव्हीड 19 रुग्णांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, करण्यात आलेल्या त्रिस्तरीय रूग्णालय व्यवस्थेची माहिती प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या / सौम्य स्वरूपाची लक्षणे असणा-या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींकरिता एक स्वतंत्र कक्ष आणि कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या क्वारंटाईन करून राहणे गरजेच्या असलेल्या व्यक्तींकरिता एक स्वतंत्र क्वारंटाईन कक्ष असे 2 स्वतंत्र कक्ष असणा-या 11 कोव्हीड केअर सेंटर, मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवरील उपचारांसाठी 7 डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवरील उपचारांसाठी 8 डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल यांची तपशिलवार माहिती उपलब्ध असणार आहे.
या माहितीमध्ये सेंटर /हॉस्पिटलची बेड्स क्षमता, सद्यस्थितीत वापरात असलेल्या बेड्सची संख्या व रुग्णसेवेसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सची संख्या प्रदर्शित होत आहे. ही आकडेवारी नियमितपणे अद्ययावत केली जाणार आहे, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन स्थितीची माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे या डॅशबोर्डवर या तिन्ही रुग्णालय व्यवस्थापनाच्या आगामी नियोजनाचीही माहिती उपलब्ध असणार आहे.
एकंदरीतच http:/nmmccovid19.in/ या लिंकवर एका क्लिकव्दारे कोव्हीड 19 च्या माहितीचा डॅशबोर्ड नागरिकांसाठी खुला होणार असून त्यावर कोरोनाविषयक सद्यस्थितीतील आकडेवारी तसेच महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 वर उपचार करण्यासाठी उपलब्ध रुग्णालये व तेथील उपलब्ध बेड्सची संख्या सहजपणे कळणार असून याव्दारे नागरिकांना एक चांगली सुविधा उपलब्ध होत आहे.
तरी नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे व कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मास्कचा अनिवार्य वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-06-2020 16:07:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update