कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी 'मिशन ब्रेक द चेन'व्दारे प्रभावी उपाययोजना राबविण्याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा कटाक्ष असून त्या अनुषंगाने कोपरखैरणे विभाग कार्यालयाचा पाहणी दौरा करीत त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात (Containment Zone) करण्यात येणा-या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना त्याची प्रत्यक्षात योग्य रितीने अंमलबजावणी केली जात आहे काय? याचा स्थानिक पातळीवर जाऊन प्रत्यक्ष आढावा घेण्याकडे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी लक्ष केंद्रीत केले असून सेक्टर 10 वाशी येथील महानगरपालिकेच्या डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालयाला अचानक भेट दिल्यानंतर कोपरखैरणे विभाग कार्यालयाला भेट देत आयुक्तांनी प्रामुख्याने प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यवाहीचा आढावा घेतला. अशाप्रकारे आयुक्तांनी प्रभाग स्तरावर आढावा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.
यामध्ये आयुक्तांनी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तसेच संबंधित विभाग कार्यालय क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रतिबंधित क्षेत्राच्या कॅटेगरी 1, 2 व 3 या तिन्ही कॅटेगरी यांची तसेच प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती घेतली.
कन्टनमेंट झोन घोषित करताना त्या क्षेत्रातील प्रवेश प्रतिबंध व निर्जंतुकीकरण त्वरित करण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात यावे असे निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले. त्याचप्रमाणे एका परिसरात जवळ जवळच्या घरांमध्ये 5 रूग्ण आढळल्यास करण्यात येणा-या 100 मी. परिसराच्या तिस-या कॅटेगरीच्या कन्टेनमेट झोनमध्ये नागरिकांनी ये-जा करू नये म्हणून लावण्यात येणारे बॅरेकेटींग 8 फूटापेक्षा उंच असावेत असे स्पष्ट करीत आयुक्तांनी अशा प्रतिबंधित क्षेत्राकडे पोलीस विभागाने अधिक लक्ष द्यावे असे उपस्थित पोलीस अधिकारी यांनी सूचित केले.
त्या सोबतच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कसा होईल याचीही काळजी घेत तशा प्रकारच्या सोयी विभाग कार्यालयांनी त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी सोसायटीचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत अशीच 42 क्षेत्रे तिस-या कॅटेगरीमध्ये विशेष प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली असून तेथील नागरिक कोरोनाची साखळी खंडीत करण्याच्या दृष्टीने घरातच कसे राहतील याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी प्राधान्याने निदर्शनास आणून देत त्यादृष्टीने अधिक काटेकोर कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका विभाग कार्यालय, नागरी आरोग्य केंद्र तसेच स्थानिक पोलीस विभाग यांना सूचित केले.