कोव्हीड 19 टेस्टींग संख्येत वाढ करून लवकर रूग्णशोध व विलगीकरणातून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा भर
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'मिशन ब्रेक द चेन' ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. याव्दारे लवकरात लवकर रूग्णशोध करून त्यांचे त्वरित विलगीकरण करण्यावर भर दिला जात असल्याने या कोरोना बाधितांच्या माध्यमातून संसर्गातून पसरणारी कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर भर दिला जात आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्रे म्हणून लॉकडाऊन घोषित केलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जात आहे व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींची लगेच ॲटिजेन टेस्ट करण्यात येत आहे.
रॅपीड अँटिजेन टेस्टींगव्दारे केवळ अर्ध्या तासाच्या आत तपासणी अहवाल प्राप्त होत असल्याने व त्यामधून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती त्वरित समजत असल्याने अँटिजेन टेस्ट सेंटर वाढविण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे. 16 जुलै रोजी सेक्टर 10 वाशी येथील महापालिकेच्या सार्वजनिक डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालय येथून रॅपीड अँटिजेन टेस्टला प्रारंभ करण्यात आला असून या टेस्ट सेंटरच्या संख्येत दररोज वाढ होईल याकडे आयुक्तांचे कटाक्षाने लक्ष आहे.
दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग
आजमितीस 18 ठिकाणी अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू असून दररोज साधारणत: 1300 हून अधिक व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. तसेच अँटिजेन आणि आर.टी.-पी.सी.आर. मिळून 2000 हून अधिक व्यक्तींच्या कोव्हीड 19 टेस्ट करण्यात येत आहेत.
16 जुलै पासून 27 जुलैपर्यंत 7950 व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये 1570 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तथापि अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला आणि त्या व्यक्तीमध्ये कोव्हीड 19 सदृष्य लक्षणे आढळत असतील तर त्या व्यक्तीची लगेच आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट महापालिकेच्या वतीने मोफत करून घेण्यात येत आहे. तसेच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 20 पेक्षा अधिक व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येते.
एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात
तुर्भे येथील ए.पी.एम.सी. च्या 5 मार्केटमध्ये संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातून जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दररोज हजारो नागरिक विविध ठिकाणाहून येत असल्याने तेथील कोरोना प्रसार नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या ए.पी.एम.सी. प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी जाहीर केल्याप्रमाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 27 जुलैपासून विशेष रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले आहे.
तपासण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने दिसते रूग्णसंख्या वाढ,
तथापि याव्दारे लवकर रूग्णशोध होऊन कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर भर
मोठ्या प्रमाणात टेस्टींग करून कोरोना बाधितांचा लवकर शोध व त्यांचे त्वरित विलगीकरण करणे शक्य होत असून याव्दारे त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टाळला जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर टेस्टींग होत असल्याने महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्ह रूग्ण संख्या काहीशी वाढलेली दिसत असली तरी या रूग्णांचे वेळेतच निदान झाल्याने त्यांच्यापासून पुढे होणारा संसर्ग टाळणे शक्य होत आहे. त्यामुळे नागरिकांनी रूग्ण संख्या वाढीमुळे चिंतीत न होता याव्दारे आपण कोरोना बांधितांचे लवकर विलगीकरण करून कोरोना नियंत्रणात ठेवत आहोत याची नोंद घ्यावी असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना सदृष्य लक्षणे जाणवल्यास अँटिजेन टेस्ट सेंटरमध्ये विनामूल्य टेस्ट करून घेण्याचे आवाहन
'मिशन ब्रेक द चेन' प्रभावीपणे राबविताना मृत्यू दर कमी करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यादृष्टीने ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, किडनीचे विकार असे आधीपासूनच आजार असणा-या व्यक्तींची जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. याकरिता सर्वेक्षण करताना अशा व्यक्तींची वेगळी नोंद करणे व त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व आरोग्य अधिकारी यांना दिलेले आहेत.
महत्वाचे म्हणजे कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, घशात खवखव, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास ती न लपवता महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्र अथवा 5 रूग्णालयांतील फ्ल्यू क्लिनीकमध्ये जाऊन तात्काळ तपासणी करून घ्यावी व रॅपीड अँटिजेन टेस्ट मोफत करून घ्यावी असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 28-07-2020 16:16:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update