कोव्हीड 19 प्रमाणेच मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधासाठीही महानगरपालिकेची व्यापक कार्यवाही
सध्या कोव्हीड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष दिले जात असले तरी पावसाळा कालावधी लक्षात घेता हिवताप, डेंग्यु आजार तसेच इतर जलजन्य आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोहिमा एप्रिल महिन्यापासून नियमित स्वरूपात सुरू आहेत.
यामध्ये विविध विभागात सायंकालीन डास सर्वेक्षण करुन जास्त डास घनता असलेल्या कार्यक्षेत्रातील बंद गटारांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर बंद गटारांच्या लाद्या उघडून त्यामध्ये डासअळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. या सोबतच घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने होऊ नयेत याकरिता व्यापक जनजागृती करण्यात येऊन शोध मोहिमेव्दारे दूषित स्थाने नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून दोनदा डासअळीनाशक फवारणी करण्यात येत आहे.
एप्रिल ते ऑगस्ट 2020 पर्यंत घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिमेव्दारे महापालिका कार्यक्षेत्रात विविध विभागांतील 5 लक्ष 35 हजार घरांना भेटी देऊन 11 लक्ष 15 हजार 510 डास उत्पत्ती स्थानांची पाहणी करण्यात आली आहे. त्यामध्ये वरची टाकी - 39678, खालची टाकी – 30303, लॉफ्ट टॅंक- 86214, ड्रम- 268332, टायर- 17874, कुंडया- 421075 व इतर- 243716 अशा स्थानांचा समावेश असून त्यापैकी 3147 ठिकाणची डासउत्पत्ती स्थाने दूषित आढळली आहेत. त्यामधील त्यातील 1574 स्थाने त्वरित नष्ट करण्यात आली असुन 1573 स्थानांवर अळीनाशक फवारणी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. संवेदनशील कार्यक्षेत्रात आठवड्यातून दोन वेळा अशाप्रकारची प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.
त्या सोबतच नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप / डेंग्यू या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हस्तपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स व होर्डींग आणि फेसबुक, ट्विटर,व्हॉट्स ॲप या समाज माध्यमांतून विविध प्रकारे माहीती शिक्षण व संपर्क कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी कोव्हीड 19 प्रसार प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरक्षित अंतर राखून जनजागृतीपर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत अशी 87 शिबिरे राबविण्यात आली आहेत.
जनजागृतीमध्ये विशेष बाब म्हणजे मलेरिया, डेंग्यू आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेशी संबंधित सहजसोप्या बाबींचे पालन करावे व विशेष काळजी घ्यावी असे गीतसंगीतमय आवाहन करणारी मराठी व हिंदी भाषेतील जिंगल तयार करण्यात आलेली असून त्याला सोशल मिडियावर चांगली पसंती मिळत आहे. धनश्री देसाई यांच्या शब्दांना संजय विवेक यांनी संगीतसाज चढविलेला असून सुप्रसिध्द गायक रोहित शास्त्री यांच्यासह विवान संकेत देसाई यांच्या सुरेल आवाजात ही जिंगल साकारलेली आहे. त्या चित्रफितीमध्ये नवी मुंबईतील नागरिकांनी सहभागी होत -
" रोगांच्या विरोधात हे युध्द आमचे पेटले आहे, मलेरिया आणि डेंग्युचा नायनाट निश्चित आहे
साचणार नाही पाणी ध्यानात घ्या, घरदार आपले आनंदी सुखमय करा
करून दाखवूया, सर्वांना शिकवूया, नवी मुंबईला मिळून सारे, निरोगी बनवूया"
- अशा शब्दात सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.
पावसाळा कालावधीत मलेरिया, डेंग्यू इ. आजारांचे संक्रमण होणार नाही याकरीता नागरिकांना आवाहन करण्यात येते की, घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा, आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी स्वच्छ करून घ्यावी, पाईप लाईनमध्ये गळती असल्यास त्वरीत पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, शिळे व उघडयावरचे अन्न खाऊ नये, तिसार झाल्यास क्षार संजिवनी मिश्रणाचा वापर करावा व अन्न सेवन चालू ठेवावे, गच्चीवर व घराच्या परिसरातील भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स इत्यादी नष्ट करावे, घरातील फुलदण्या, ट्रे, फेंगशुई मध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे, घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम / टाक्या / भांडी आठवडयातून एकदा पाणी काढून पूर्णपणे कोरडे करावेत, शक्यतो डास प्रतिबंधात्मक मच्छर दाणीचा वापर करावा, आपल्या घरी येणा-या महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांमार्फत व महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये / दवाखान्यांमध्ये तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी सुविधा उपलब्ध आहे ती करुन घ्यावी तसेच आपले घर, कार्यालय, व परिसरात पाणी साचू देऊ नये.
सध्या कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या नजिकच्या महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्राशी अथवा रूग्णालयाशी संपर्क साधून वेळीच उपचार करून घ्यावेत जेणेकरून आपले नवी मुंबई शहर निरोगी राखण्यास मदत होईल असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-09-2020 10:27:07,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update