कोव्हीड - 19 आपत्कालीन परिस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना विशेष अनुदान
नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रामार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या दिव्यांग मुले व व्यक्तींची नावे नोंदणी करण्याकरीता "स्वीकार" संकेतस्थळाची www.nmmcsweekar.in निर्मिती करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दिव्यांग मुले तथा व्यक्तींकरिता कोव्हीड - 19 मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीचा हात म्हणून विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याचा कल्याणकारी निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात येत असून 31 मे 2021 पर्यंत यासाठीचे अर्ज व कागदपत्रे दाखल करावयाची आहेत.
अन्नधान्य व आरोग्य किट खरेदी करण्याकरीता प्रति व्यक्ती रु.1221/- तसेच विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरीता अर्थसहाय्य योजनांतर्गत विशेष अनुदान रु.3000/- उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
ज्या दिव्यांग मुले व व्यक्तींनी नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्रामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत सहभाग घेतलेला आहे, त्या दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्याचा तपशील व रहिवाशी दाखला ईटीसी केंद्राकडे उपलब्ध आहे. त्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींनी पुन्हा अर्ज किंवा कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या बँक खात्यामध्ये विशेष अनुदान रक्कम थेट हस्तांतरित करण्यात येईल.
तथापि, ज्या दिव्यांग मुले व व्यक्तींनी महापालिकेच्या ईटीसी केंद्रामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये सहभाग घेतलेला नाही, त्यांच्या बँक खात्याचा तपशील व आवश्यक कागदपत्रे ईटीसी केंद्राकडे जमा नाहीत. त्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या "स्वीकार" संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन कागदपत्रांसह जमा करणे अनिवार्य आहे.
अर्ज छपाईची उपलब्धता नसल्यास अर्ज ज्या स्वरुपात आहे त्या स्वरुपात कागदावर लिहून जमा करावा. पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, वास्तव्याचा दाखला अशाप्रकारची कागदपत्रे सोबत जोडावीत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्पष्ट उल्लेख असलेला पत्ता व त्यावर दिव्यांग व्यक्तीचे नाव असलेले आधारकार्ड / रेशनकार्ड / लाईटबील / मालमत्ता कर पावती/ बँकेचे खाते पुस्तक / निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे. या विशेष अनुदानाकरिता अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची अंतिम दिनांक 31 मे 2021 अशी आहे.
नागरिकांची सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीकोनातून अर्ज व कागदपत्रे nmmcetcscheme@gmail.com यावर Online किंवा अर्ज प्रत्यक्षरित्या जमा करावयाचा असल्यास सोमवारी कोपरखैरणे व बेलापूर विभाग कार्यालयात, मंगळवारी घणसोली व नेरुळ विभाग कार्यालयात, बुधवारी ऐरोली व तुर्भे विभाग कार्यालयात व गुरुवारी दिघा व वाशी विभाग कार्यालयात सुरक्षित अंतराच्या नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करुन अर्ज जमा करावयाचा आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील ईटीसी केंद्राचे रुगपांतर कोव्हीड केअर सेंटरमध्ये करण्यात आलेले असल्यामुळे त्याठिकाणी अर्ज सादर करण्यास येऊ नयेत असे सूचित करण्यात येत आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त दिव्यांग मुले व व्यक्तींनी या विशेष अनुदानाचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 21-05-2021 14:06:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update