आजचे महत्वाचे (दि. 8/4/2020)
पोलीस, एपीएमसी, अन्न व औषधे प्रशासन अधिका-यांशी जीवनावश्यक वस्तू वितरण
नियोजनाविषयक महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांची चर्चात्मक बैठक
l देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कोव्हीड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी काल (7/4/2020) महानगरपालिका क्षेत्रातील किराणा मालाचे होलसेल व रिटेल व्यापारी यांचेशी सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडील उपलब्ध साठ्याचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या.
l त्या अनुषंगाने आज पोलीस विभाग, ए.पी.एम.सी. आणि अन्न व औषधे प्रशासन यांच्या अधिका-यांच्या बैठकीत एपीएमसी मार्केटमधून रिटेल व्यापा-यांना आवश्यक किराणा माल सुलभतेने उपलब्ध व्हावा, जेणेकरून त्यांच्यामार्फत विभागातील ग्राहकांपर्यंत तो व्यवस्थित पोहचेल व गर्दी होणार नाही यादृष्टीने ए.पी.एम.सी. मध्ये माल उतरविण्याचे आणि व्यापा-यांना वितरित करण्यासाठी दिवस निश्चित करावेत आणि ते सर्वांना समजतील अशा पध्दतीने जाहीर करावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याठिकाणी विलंब टाळण्यासाठी व्यापा-यांना कॅशलेस व्यवहाराच्या सूचना द्याव्यात असेही आयुक्तांनी ए.पी.एम.सी. प्रतिनिधींना सूचित केले.
l रिटेलर व्यापा-यांना ए.पी.एम.सी. मध्ये माल घेण्यासाठी ये-जा करताना त्रास होतो या अडचणीच्या अनुषंगाने पोलीस विभागाकडून ऑनलाईन अर्ज करून पास घ्यावेत असे यावेळी पोलीस उपआयुक्त श्री. पंकज डहाणे यांनी सूचित केले. या पासच्या अनुषंगाने ए.पी.एम.सी. प्रशासनाने मार्केट आवारात रिटेलरच्या वाहनांना प्रवेश द्यावा अशा सूचना आयुक्तांनी याप्रसंगी दिल्या.
l नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी संयुक्तपणे विचार करून नवी मुंबईतील औषधांची दुकाने वगळता इतर अत्यावश्यक साहित्याची दुकाने सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरू राहतील असे जाहीर केले असून अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीने मास्क बांधून घराबाहेर पडावे व सोशल डिस्टन्सिंग राखण्याची काळजी घ्यावी असे सूचित केले आहे. विनाकारण घराबाहेर फिरणा-या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले आहे.
l डी मार्ट / रिलायन्स तसेच तत्सम स्टोअर्सने त्यांच्याकडे दूध खरेदी करण्यास येणारी गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने दूधाचे काऊंटर बाहेरच्या बाजूस सुरू करावे, जेणेकरून सोशल डिस्टन्सींग राखले जाईल असे निर्देशित करण्यात आले.
l नागरिकांची भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी टाळण्यासाठी महानगरपालिकेने विभागवार भाजीपाला पुरवठादारांची यादी त्यांच्या मोबाईल क्रमांकासह www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली असून भाजी विक्रेत्यांची व्यवस्था मोकळ्या जागा व मैदानात केलेली आहे. तथापि मागील काही दिवसात भाजी विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असून विभाग कार्यालये आणि पोलीस विभागामार्फत यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
l नागरिकांनी घरपोच जीवनावश्यक वस्तुंची डिलिव्हरी मिळण्यासाठी महानगरपालिकने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या सहयोगाने Navi Mumbai Bazzar हे मोबाईल ॲप विकसित केले असून त्याव्दारे नागरिकांनी ऑनलाईन आवश्यक साहित्य मागवून घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
l या बैठकीस महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, पोलीस उपआयुक्त श्री. पंकज डहाणे, महापालिका उपआयुक्त श्री. किरणराज यादव, श्री. नितीन काळे व श्री. दादासाहेब चाबुकस्वार तसेच ए.पी.एम.सी., अन्न व औषधे प्रशासन या प्राधिकरणांचे उच्च अधिकारी तसेच डी मार्ट, रिलायन्स अशा पुरवठादार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------
67 दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य
l देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यादृष्टीने काळजी घेण्यात येत असून महानगरपालिकेमार्फत 67 दिव्यांग व्यक्तींना 3 किलो तांदूळ, 5 किलो गव्हाचे पीठ, 1 किलो तूरडाळ, 1 किलो साखर, 1 किलो मीठ व 1 किलो तेल अशा जीवनावश्यक साहित्यांचे किट्स वितरित करण्यात आले.
-------------------------------------------------------------------------
कोव्हिड - 19 आजचे अपडेट (08/04/2020)
l सेक्टर 38 नेरुळ येथील कोरोना पॉझीटिव्ह असलेल्या 72 वर्षीय नागरिकाचे टेस्ट रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले असून कोरोना पॉझीटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची संख्या आता 5 झालेली आहे.
l सोमवार दि. 06 एप्रिल 2020 रोजी महानगरपालिकेच्या वाशी येथील कोव्हिड - 19 स्पेशन रुग्णालयात प्रसुती झालेल्या घणसोली सेक्टर 9 येथील महिलेच्या बाळाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे.
l वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात सुरु केलेल्या कोव्हिड - 19 स्पेशल रुग्णालयामध्ये आजमितीस 4 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीत व्यक्ती आणि 2 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील (पनवेल) कोरोना बाधीत व्यक्ती उपचार घेत आहेत.
l नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सेक्टर 19 कोपरखैरणे येथील दि.01/04/2020 रोजी कोरोना पॉझीटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या घरातील 7 निकटच्या संबंधीत व्यक्तींचे नमुने तपासणीअंती 7 पैकी 5 नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 2 नमुन्यांचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आलेले आहेत. सदर सेक्टर 19 कोपरखैरणे चा परिसर यापूर्वीच कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर झाला असून त्या कोरोना पॉझीटिव्ह व्यक्तीच्या दूरच्या संबंधीत 27 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत.
|