*महानगरपालिकेतील 192 आरोग्यकर्मी व पहिल्या फळीतील कोरोनायोध्द्यांनी घेतला प्रिकॉशन डोस*
केंद्र व राज्य शासनामार्फत प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी (HCW), पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) तसेच सहव्याधी (Comorbid) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना "प्रिकॉशन डोस" देण्यास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजनबध्दरित्या सुरूवात करण्यात आलेली आहे. 10 व 11 जानेवारी या दोन दिवसात 1791 पात्र लाभार्थ्यांनी कोव्हीड प्रिकॉशन डोसचा लाभ घेतलेला आहे.
या अनुषंगाने आज महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये आरोग्यकर्मी व पहिल्या फळीतल कोरोना योध्दे यांच्याकरिता प्रिकॉशन डोस देण्याकरिता विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. सकाळपासूनच या लसीकरण सत्राला अधिकारी, कर्मचारी यांची उत्साही उपस्थिती होती. 13 एप्रिल 2021 रोजी व त्यापूर्वी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेल्या 192 आरोग्यकर्मी व कोरोना योध्द्यांचे या विशेष सत्रात लसीकरण करण्यात आले. यामध्ये 26 आरोग्यकर्मी तसेच 166 पहिल्या फळीतील कोरोनायोध्दे यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
कोव्हीडपासून अधिक संरक्षणाच्या दृष्टीने आरोग्यकर्मी (HCW), पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) तसेच सहव्याधी (Comorbid) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना "प्रिकॉशन डोस" दिला जात असून लाभार्थ्यांनी योग्य वेळेत प्रिकॉशन डोस घ्यावा आणि प्रिकॉशन डोस घेतल्यानंतरही मास्क हीच कोव्हीडपासून संरक्षणाची आपली सर्वात मोठी ढाल आहे हे लक्षात घेऊन मास्कचा नियमित वापर करावा आणि कोव्हीड नियमावलीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-01-2022 13:48:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update