विशेष मिशन इंद्रधनुष 2.0 मोहिमेच्या दुस-या टप्प्याचे यशस्वी आयोजनाकरीता आरोग्य विभाग सज्ज
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 'विशेष मिशन इंद्रधनुष 2.0' च्या चार मोहिमांचे नियोजन करण्यात आले असून यामधील पहिली मोहीम 2 डिसेंबर 2019 मध्ये राबविण्यात आली व दुसरी मोहीम जानेवारी 2020 मध्ये राबविण्यात येत आहे.
जोखीमग्रस्त भागातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला डयू लिस्ट प्रमाणे नियमित लसीकरण करुन नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण 95% पेक्षा जास्त करणे हे 'विशेष मिशन इंद्रधनुष 2.0' मोहिमेचे उद्दीष्ट आहे. याचा एक महत्वाचा भाग म्हणून महापालिका कार्यक्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्याच्या नियमित लसीकरणामध्ये आशा, अंगणवाडी कर्मचारी यांचा मोठया प्रमाणावर सहभाग घेऊन नकार लाभार्थींकरीता विशेष उपाययोजना करुन मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत. मोहिमेच्या डिसेंबर महिन्यातील प्रथम टप्प्यामध्ये 100% काम झाल्याबद्दल सर्वांचे आयुक्तांनी अभिनंदन केले व या मोहिमेतील अपेक्षित लाभार्थ्यांच्या यादीपैकी प्रत्येक लाभार्थीवर लक्ष केंद्रीत करुन 100% उद्दिष्टपूर्ती करण्याकरीता प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत निर्देश दिले.
सिटी टास्क फोर्स समितीच्या या व्दितीय सभेमध्ये महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे समवेत अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे, इंडीयन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष, इंडीयन पिडीयाट्रीक असोसिएशन सदस्य, आय.सी.डी. एस. व इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
'विशेष मिशन इंद्रधनुष 2.0' च्या प्रथम टप्यामध्ये एकूण 51 बाहयसंपर्क सत्रे 17 मोबाईल सत्रे अशा एकूण 68 सत्रांद्वारे 603 बालकांचे व 146 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे.
'विशेष मिशन इंद्रधनुष 2.0' मोहिमे अंतर्गत दुसऱ्या सत्राकरिता महापालिका कार्यक्षेत्रात 52 बाहय संपर्क सत्रांचे आणि 16 मोबाईल सत्रांचे अशा एकूण 68 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रांव्दारे 105 गरोदर माता व 560 बालकांचे अशा एकूण 665 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष बाब म्हणून प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्याच्या दृष्टीने बालकाला, मातेला लसीकरणाच्या आदल्या दिवशी भेट देऊन कार्ड देण्यात येणार आहे. ज्यामध्ये बालकाचे नाव, लसीकरणाचे ठिकाण व दिनांक नमूद करण्यात येणार आहे.
मोहिमेच्या जनजागृती करीता सर्व रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आठही विभाग कार्यालय याठिकाणी होर्डींग उभारण्यात आले असून विविध प्रकारचे पोस्टर्स छापण्यात आले आहेत.
या बैठकीमध्ये डॉ. रत्नप्रभा चव्हाण, वैद्यकीय अधिकारी यांनी सादरीकरण करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून होत असलेल्या अंमलबजावणी बाबत माहिती दिली. यावेळी नियमित लसीकरण सत्राचा आढावा घेण्यात आला तसेच यापुढील विशेष मिशन इंद्रधनुष 2.0 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या टप्यात झालेले काम व दुसऱ्या टप्प्याची तयारी याबाबत चर्चा करण्यात आली.
Published on : 04-01-2020 14:43:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update