तुर्भ्यामध्ये 2 टनाहून अधिक प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, 50 हजार रक्कमेची दंडात्मक कारवाई

प्लास्टिकमु्क्त नवी मुंबई शहर हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांच्या वापराची सवय नागरिकांना लागावी यादृष्टीने मार्केट्समध्ये कापडी पिशव्यांचे विनामुल्य वाटप असे उपक्रम राबविण्याबरोबरच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात आहेत.
अशाच प्रकारची प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांवरील धडक कारवाई करीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुखदेव येडवे आणि त्यांच्या सहकारी कर्मचा-यांसमवेत तुर्भे येथे 2 टन 30 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला तसेच रु.50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आली. 10 दिवसांपूर्वीच तुर्भे विभागातूनच 1 टन 200 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याच विभागात ही दुसरी मोठी कारवाई आज कऱण्यात आलेली आहे.
या कारवाईमध्ये तुर्भे येथील मसाला मार्केट मधील विधी प्लास्टिकचे गोडाऊन, ग्रोमा सेंटरमधील गाला ब्रदर्स, जयेश कुमार, सिंघवी प्लास्टिक या व्यावसायिकांवर दुस-यांदा प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापराचा गुन्हा दाखल झाल्याने प्रत्येकी रु.10 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठाही जप्त करण्यात आला व त्यांस समज देण्यात आली.
त्याचप्रमाणे तुर्भे येथील मर्चंट सेंटर मधील न्यू मार्ट आणि ओम फरसाण मार्ट या दोन दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळल्याने पहिला गुन्हा म्हणून त्यांच्याकडून प्रत्येक रु.5 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आली.
याप्रमाणेच 21 डिसेंबरला सेक्टर 19 तुर्भे येथील थर्माकोल गोडाऊनवर अचानक छापा टाकत 239 बॉक्स जप्त करीत त्यात असलेले साधारणत: 350 किलो वजनाचे थर्माकोल जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून रु. 10 हजार इतकी दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली.
प्रतिबंधात्मक प्लास्टिकला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून हद्दपार करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका जनजागृती आणि प्रतिबंधात्मक कारवाया या दोन्ही माध्यमांतून प्रयत्न करीत असून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-12-2022 10:20:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update