*2 मॉल, 7 डि मार्टमध्ये प्रिकॉशन डोस घेणा-यांना लकी ड्रॉ व्दारे प्रोत्साहन* *नवी मुंबई महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम*
केंद्र व राज्य आरोग्य विभागाच्या आदेशानुसार 15 जुलैपासून ‘कोव्हीड 19 लसीकरण अमृत महोत्सव’ अंतर्गत 18 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रिकॉशन डोस दिला जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेऊन लस संरक्षित व्हावे यादृष्टीने विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे.
यामध्ये एक अभिनव उपक्रम म्हणून नेक्सस ग्रॅंड सेंट्रल सीवूड मॉल आणि इनॉर्बिट मॉल वाशी या 2 मॉल्समध्ये तसेच 7 डी-मार्ट अशा 9 ठिकाणी प्रिकॉशन डोसची विशेष लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. याठिकाणी प्रिकॉशन डोस घेणा-या नागरिकांस कुपन दिले जात असून त्याचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे व प्रत्येक केंद्रावरील 3 भाग्यवान विजेत्यांना 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.
आज 23 जुलै पासून मॉल्स व डि मार्टमधील प्रिकॉशन डोसच्या या विशेष लसीकरण केंद्रांना सुरूवात झालेली असून सोमवार ते शुक्रवार दुपारी 3 ते 9 आणि शनिवार व रविवार रोजी सकाळी 10 ते रात्री 9 वा. पर्यंत येथील प्रिकॉशन डोस लसीकरणाची वेळ असणार आहे.
आज पहिल्याच दिवशी सायं. 4 वाजेपर्यंत या मॉल्स, डि मार्टमधील 9 विशेष लसीकरण केंद्रांवर 18 ते 59 वयोगटातील 1151 नागरिकांनी तसेच 60 वर्षावरील 44 अशा एकूण 1195 नागरिकांनी प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला आहे.
याशिवाय विविध सोसायट्या, कार्यालये, आस्थापना याठिकाणी तेथील मागणीनुसार विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. विविध महाविद्यालयांमध्येही लसीकरणाबाबत 25 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रिकॉशन डोस देणेबाबत नियोजन करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे 12 ते 14 वयोगटातील तसेच 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाकडेही विशेष लक्ष देत शाळांमध्ये दुसरी फेरी राबविली जात आहेत. सोशल माध्यमांवरील आवाहनांप्रमाणेच विविध विभागांत ध्वनीक्षेपकाव्दारेही लसीकरणाबाबत आवाहन केले जात आहे.
महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली ही रूग्णालये, तुर्भे व बेलापूर येथील माता बाल रूग्णालये तसेच 23 नागरी आरोग्य केंद्रे आणि ईएसआयएस रूग्णालय सेक्टर 5 वाशी येथे दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रिकॉशन डोस दिला जात आहे. यामध्ये वाशी सार्वजनिक रूग्णालयामधील लसीकरण केंद्राची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
15 जुलैपासून मागील आठवड्याभरात 12392 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला असून कोव्हीड झाल्यास त्याची तीव्रता कमी करणारा प्रिकॉशन डोस घेऊन 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी लस संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 23-07-2022 15:13:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update