*2018 नंतर पहिल्यांदाच दिवंगत 13 महापालिका कर्मचा-यांच्या कुटुंबियांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती*
*नवी मुंबई महानगरपालिका सेवेत असताना ज्या अधिकारी, कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे अशा अधिकारी, कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याबाबतची तरतूद आहे. अशा प्रकारचे प्रस्ताव सन 2018 पासून प्रलंबित होते. दिवंगत महापालिका कर्मचा-यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या वतीने प्रशासन विभागास देण्यात आले होते. त्यावर कार्यवाही करीत सन 2018 नंतर पहिल्यांदाच महापालिका सेवेत असताना मृत्यू झालेल्या 13 अधिकारी, कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांना आज लिपीक - टंकलेखक पदावर नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत.*
नागरिकांना दर्जेदार सेवासुविधा विहित कालावधीत पुरविण्याप्रमाणेच महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे सेवा पुरविण्यासाठी कार्यरत असणा-या महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवाविषयक विविध बाबीकडे प्राधान्याने लक्ष आहे. त्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारीवृंदाचे मागील ब-याच वर्षापासून प्रलंबित असलेले अनेक प्रश्न आयुक्तांनी विशेष लक्ष दिल्याने प्रशासन विभागास दिलेल्या निर्देशानुसार व सुरू असलेल्या कार्यवाहीचा त्यांच्यामार्फत सातत्याने आढावा घेतला जात असल्याने मार्गी लागले आहेत.
*मागील एका वर्षात 467 कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेला असून 292 अधिकारी, कर्मचारी यांना वर्ग 1 मधील उपआयुक्त ते वर्ग 3 मधील विविध पदांमध्ये पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. कालच 3 वाहनचालकांना त्यांच्या शैक्षणिक व इतर आवश्यक पात्रतेनुसार लिपिक-टंकलेखक पदावर बदलीने नियुक्ती देण्यात आलेली आहे.*
अशाच प्रकारे सन 2018 पासून अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज दाखल केलेल्या महापालिका सेवेत असताना मृत्यू झालेल्या महापालिका अधिकारी – कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांच्या प्रतिक्षा सूचीतील अर्जावर निर्णय घेत 13 कुटुंबियांना कार्यालयीन प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर लिपिक-टंकलेखक पदावर थेट नियुक्ती आदेश देण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधास 21 ऑगस्ट 2017 रोजी शासन मंजूरी प्राप्त झाली असून 30 मार्च 2021 च्या शासन अधिसूचनेनुसार सेवाप्रवेश नियमावली लागू करण्यात आलेली आहे. यामधील शैक्षणिक व तांत्रिक अहर्तेनुसार अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी प्राप्त अर्जांमधील क संवर्गातील 10 तसेच ड संवर्गातील 18 पात्र अर्जदारांचा प्रस्ताव अधिसंख्य पदाच्या मान्यतेकरिता शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
तथापि दरम्यानच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत लिपिक-टंकलेखक पदावरील कर्मचा-यांची वरिष्ठ पदावर पदोन्नती झाल्याने त्या जागा रिक्त झाल्या. या जागांवर अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या प्रतिक्षा सूचीतील अहर्ताधारक 13 पात्र अर्जदारांना लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्यास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली व तसे नियुक्ती आदेश त्यांना प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.
*वाहनचालक, सुरक्षारक्षक, कक्षसेविका, स्वच्छता निरिक्षक, अग्निशामक, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध पदांवर महानगरपालिकेत नोकरी करत असताना आमचे आई किंवा वडील यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर अचानक ओढविलेल्या संकटातून सावरण्यासाठी महानगरपालिका सेवेत सामावून घेतल्याने हा आमच्यासाठी फार मोठा आधार असल्याची भावना नियुक्ती आदेश घेताना या नवनियुक्त कर्मचा-यांनी व्यक्त केली.*
मागील 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील 13 महापालिका कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या कुटुंबाला मदत होणार आहे ही समाधानाची गोष्ट असून नवनियुक्त कर्मचारी आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून आपल्या पदाच्या कामाला न्याय देतील असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.
Published on : 24-08-2022 14:18:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update