स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये कचरा वर्गीकरणात घरगुती घातक कचरा स्वतंत्र संकलनावर भर
स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम व देशात सातव्या क्रमांकाचे मानांकन उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये कचरा निर्माण होतो अशा घर, नोकरी-व्यवसाय यांच्या ठिकाणी ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे तसेच कचरा गाडीतही तो वेगवेगळा दिला जात आहे. यापुढील काळात ओला व सुका कचरा या व्यतिरिक्त घरातील घरगुती घातक कचरा वेगळा ठेवला जाऊन तो स्वतंत्ररित्या संकलित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
घरोघरी मुले, वृध्द व्यक्ती यांच्याकरिता वापरले जाणारे डायपर्स, सॅनिटरी नॅपकीन, बॅटरी सेल, रंगाचे डबे, केमिकल स्प्रे, जंतुनाशके, औषधांच्या रिकाम्या बाटल्या अशा प्रकारच्या घातक कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असते, कारण अशा कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठया प्रमाणावर होणारी हानी टाळण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने विघातक असलेल्या घरगुती घातक कचऱ्याचे ओला व सुका या व्यतिरिक्त स्वतंत्र संकलन करण्यात येऊन त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले आहे.
घरगुती घातक कचरा संकलनाकरीता सोसायट्या, वसाहती यांना टप्प्याटप्प्याने लाल रंगाचे डबेही पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे घंटागाडीतही घरगुती घातक कच-यासाठी वेगळी व्यवस्था असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालये व दवाखाने येथील जैवीक कच-याची शास्त्रोक्त विल्हेवाट मुंबई वेस्ट मॅनेजमेंट संस्थेमार्फत दैनंदिन स्वरुपात करण्यात येत असून घरगुती घातक कच-याचीही सुयोग्य विल्हेवाट लावण्याचे काम त्यांच्यामार्फतच केले जाणार आहे.
ओला व सुका कचरा वेगळा करण्यात स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी नेहमीच सक्रीय योगदान दिले आहे. अशाच प्रकारची कार्यवाही घरगुती घातक कचरा वेगळा ठेवण्यातही अपेक्षित असून नवी मुंबईकर नागरिक या कामी पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सक्रीय सहभाग देतील असा विश्वास महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
Published on : 16-12-2019 07:18:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update