'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मनोरंजक पथनाट्यातून स्वच्छतेचे प्रबोधन
स्वच्छता विषयक जनजागृतीमध्येही स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने आघाडी घेतली असून विविध पारंपारिक व आधुनिक माध्यमांचा वापर केला जात आहे. सर्वसाधारणपणे भारतीय जनमानसात असलेली नाटकाची आवड लक्षात घेऊन मनोरंजानासह प्रबोधन करणा-या स्वच्छता विषयक पथनाट्यांवरही भर दिला जात आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आरंभ क्रिएशन्स आणि श्रावस्ती नाट्यसंस्था हे दोन नाट्यसमुह आपल्या कलावंतांसह वर्दळीच्या ठिकाणी तसेच मुख्य चौकात स्वच्छतेचा संदेश प्रसारित करणारी पथनाट्ये सादर करीत आहेत. या पथनाट्यांना जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असून हसत खेळत अस्वच्छतेच्या मानसिकतेवर व्यंगात्मक टिका करत या पथनाट्यातील कलावंत उपस्थितांच्या डोळ्यात स्वच्छतेचे अंजन घालत आहेत.
परिसरातील लोकसंख्येचा अंदाज घेत मराठी तसेच हिंदी अथवा मिश्र भाषेत हे पथनाट्य कलावंत उपस्थितांशी थेट संवाद साधत असून त्यांना आपले नवी मुंबई शहर स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये सहभागी झाले असून आपल्या शहराला देशात नंबर 1 करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सज्ज व्हायचे आहे असे आवाहन करीत आहेत. याकरिता ओला व सुका कचरा वर्गीकरण, एकाच वेळी वापरून कच-यात टाकल्या जाणा-या सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे, सार्वजनिक ठिकाणी अगदी छोट्या स्वरुपातील कचराही कचरा कुंडीतच टाकणे याविषयी मनोरंजक भाष्य करीत आहेत.
नवी मुंबईचे रुप मागील वर्षीपेक्षा यावर्षी अधिक सुंदर दिसत असून स्वच्छता संदेश देणा-या चित्रमय भिंतीतून शहराचे रुप पालटले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागा तसेच दुभाजकांमध्ये वृक्षरोपे असल्याने शहरातील हिरवाई वाढलेली आहे. नवी मुंबईतील स्वच्छ सार्वजनिक व सामुदायिक शौचालये गुगल मॅपवर सहज दिसत असून त्यामुळे नागरिकांप्रमाणेच शहरातून प्रवास करणा-या प्रवाशांचीही सोय झालेली आहे. यावर्षी नवी मुंबई महानगरपालिका कचरामुक्त शहरांमध्ये फाईव्ह स्टार रेटींगची मानकरी ठरलेली असून मागील वर्षी लाभलेला हागणदारीमुक्त ओडीएफ डबल प्लस शहराचे मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे व ते केंद्र सरकारने प्रमाणित केले आहे. त्यामुळे शहराचा नावलौकीक टिकविणे व कुठेही अस्वच्छता न करता या मानांकनात भर घालणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून त्याकरीता आपण सज्ज असायला हवे असा संदेश हे पथनाट्य कलावंत हसत खेळत लोकांच्या मनामनात रुजवत आहेत.
श्रावस्ती नाट्यसंस्थेचा समुह देवेन बच्छाव यांच्या दिग्दर्शनाखाली परिमंडळ 2 क्षेत्रात तसेच आरंभ क्रिएशन्स यांचा पथनाट्य समुह मिलिंद खानविलकर यांच्या दिग्दर्शनाखाली व वैदेही व्यवहारे यांच्या संयोजनाखाली परिमंडळ 1 क्षेत्रात पथनाट्य सादरीकरण करत जनमानसाला स्वच्छतेचे महत्व सांगत आहेत. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये नागरिकांची जबाबदारी पटवून देत आहेत.
पथनाट्य हे भारतीय नागरिकांना भावणारे प्रभावी माध्यम असून याव्दारे दिला जाणारा स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा संदेश नागरिकांनी मनापासून जपावा व आपल्या नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात नंबर 1 आणण्यासाठी सक्रीय सहभाग द्यावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-01-2020 14:50:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update