"कलाविष्कार 2020" महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा नृत्य, गायन, अभिनयाचा जल्लोष
नवी मुंबईच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील गौरवात प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाचे महत्वाचे योगदान असून हे श्रेय सगळ्यांचे असल्याचे मत व्यक्त करीत यापुढील काळात अधिक नियोजनबध्द विकास होईल असे सांगत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी व्यासपीठावरील सादरीकरणामुळे आत्मविश्वास मिळतो व लहान वयापासूनच अशा स्पर्धांच्या सहभागामुळे व्यक्तीमत्व विकास होतो, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या या कला स्पर्धांतून उद्याचे गुणवंत कलाकार घडतील असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय कला व सांस्कृतिक स्पर्धा (कलाविष्कार 2020) च्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी आमदार श्री. गणेश नाईक यांच्या समवेत महापौर श्री. जयवंत सुतार, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, क्रीडा विभागाचे उप आयुक्त श्री. नितीन काळे, सुप्रसिध्द हास्य अभिनेत्री श्रीम. विशाखा सुभेदार, क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे व श्री. रेवप्पा गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. रुतीका संखे, स्पर्धेच्या परिक्षक संगीत विशारद श्रीम. मानसी जोशी, नृत्य अलंकार डॉ. रुपाली देशपांडे, अभिनेत्री श्रीम. जानकी पाठक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना महापौर श्री. जयवंत सुतार यांनी कलाविष्कार 2020 मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले गायन, नृत्य, अभिनय पाहून नवी मुंबईचे कलाभविष्य उज्वल असल्याची खात्री पटते अशा शब्दात विद्यार्थी कलावंतांचे कौतुक केले. 3 मार्च रोजी होणा-या महापौर चषक गायन व नृत्य स्पर्धेत कलाविष्कार 2020 मध्ये प्रथम क्रमांक संपादन करणा-या कलावंत व कलावंत समुहांना थेट अंतिम फेरीत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा महापौरांनी केली.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित या स्पर्धेमध्ये 74 शाळांतील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे कौतुक केले.
सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीम. विशाखा सुभेदार यांनी विद्यार्थ्यांचे कलागुण योग्य वयात फुलविण्याची संधी देणा-या महानगरपालिकेच्या कलाविष्कार उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक करीत शाळेतील शिक्षक आपल्यावर जे संस्कार करतात त्याची शिदोरी आयुष्यभर पुरते त्यामुळे शिक्षकांनी सांगितलेले नीट ऐका व लक्षात ठेवा अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वत:मधील कलेला मुक्त वाव देणे व व्यक्त होणे हे आनंदाने जगण्याचे लक्षण आहे असे सांगत श्रीम. विशाखा सुभेदार यांनी कलेची साथ सोडू नका असे आवाहन मुलांना केले.
कलाविष्कार 2020 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणा-या पुर्व प्राथमिक समुह नृत्य, प्राथमिक वैयक्तिक नृत्य, प्राथमिक समुह नृत्य, माध्यमिक वैयक्तिक नृत्य, माध्यमिक समुह नृत्य, प्राथमिक वैयक्तिक गायन, प्राथमिक समुह गायन, माध्यमिक वैयक्तिक गायन, माध्यमिक समुह गायन, प्राथमिक वैयक्तिक कलाविष्कार, प्राथमिक सामुहिक कलाविष्कार, माध्यमिक वैयक्तिक कलाविष्कार व माध्यमिक समुह कलाविष्कार अशा 13 विभागात प्रत्येकी 3 विजेत्यांना स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रासह पारितोषिक रक्कम प्रदान करण्यात आली.
मागील 3 आठवड्यांपासून विभागीय, केंद्र व महापालिका अशा तीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या तीनही फे-यांमध्ये 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहाने सहभाग घेतला व पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांचे कलाविष्कार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
Published on : 26-02-2020 07:17:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update