*बकरी ईद 2021 बाबत मार्गदर्शक सूचना जाहीर*
साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम, 1897 मधील कलम 2, 3 व 4 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार कोरोना विषाणूमूळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगास (COVID-19) प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी अधिसुचना क्र. कोरोना 2020/ प्र.क्र. 58/ आरोग्य 5, दि. 14 मार्च 2020 ची अमंलबजावणी सुरु करण्यात आलेली असून सदर अधिसूचनेच्या नियम 3 व 10 नुसार महानगरपालिका आयुक्त हे कोविड-19 नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रधिकृत आहेत. मुस्लीम बांधवाकडून बकरी ईद (ईद-उल-अजहा) दि. 21 जुलै 2021 रोजी साजरी होत असून या सणानिमित्ताने लहान-मोठ्या जनावरांची कुर्बानी करण्याची प्रथा आहे. कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय शासनाव्दारे घेण्यात आलेला असून महाराष्ट्र शासनाच्या दि. 02 जुलै 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये बकरी ईद साजरी करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
- कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरून बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
- सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी.
- नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
- लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain, Dated 04/06/2021 आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
- बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
- कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेव्दारे विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे लागेल.
- नवी मुंबई महानगरपालिकेव्दारे शहराच्या विविध भागांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात सामुदायिक कत्तलखान्यांकरीता परवानगी देण्यात येत होती, परंतू यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता तात्पुरत्या स्वरुपात सामुदायिक कत्तलखान्यांकरीता परवानगी देण्यात येणार नाही.
महानगरपालिकेव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार साध्या पध्दतीने बकरी ईद साजरी करायची असून प्रतिकात्मक कुर्बानी करण्यात यावी तसेच कुठेही गर्दी होणार नाही याची उचित दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 14-07-2021 13:46:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update