*'स्वच्छ सर्वेक्षण 2022' करिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज*

'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेला लाभला असून ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची गोष्ट असली तरी यामुळे 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला सामोरे जाताना आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत व त्या अनुषंगाने आपली जबाबदारीही वाढली असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत आयुक्तांनी संबंधित अधिकारी, कर्मचारीवृंदाशी संवाद साधत अधिक उत्तम कामगिरीच्या अपेक्षा व्यक्त केल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छ भारत मिशन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे व्यासपिठावर उपस्थित होते.
आपली स्पर्धा नेहमी आपल्याशीच असते असे स्पष्ट करीत आयुक्तांनी मागील वर्षापेक्षा आपल्या कामगिरीचा आलेख उंचाविण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने संपूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावे असे निर्देश याप्रसंगी दिले. शहर सुशोभिकरणामध्ये मागील वर्षी अत्यंत उत्तम काम केल्यामुळे शहराचे रुप बदलून गेल्याच्या अभिप्राय येथील नागरिकांनी ज्याप्रमाणे दिला त्याचप्रमाणे शहराला भेट देणा-या प्रवासी व पर्यटकांनीही दिला. शहर स्वच्छतेप्रमाणेच सौंदर्यीकरणातही उत्तम काम केल्याचा परिणाम स्वच्छ सर्वेक्षणाच्या गुणांकनात दिसून आला असून यावर्षी अधिक वेगळ्या संकल्पना वापरून शहर सुशोभिकरणाला नवा आयाम द्यावा असे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी विविध देशातील सुशोभिकरणाच्या आगळ्यावेगळ्या छायाचित्रांचे सादरीकरण करण्यात आले व अशाप्रकारे नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग यावेळेच्या कामात करण्यात यावा अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून रेल्वेने प्रवास करणारे हजारो प्रवासी असून त्यादृष्टीने यावर्षी सुशोभिकरण करताना रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूस असणा-या दर्शनी भिंतींना आकर्षक रंगसंगतीने सजविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे सायन पनवेल हायवेवरून मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करीत असून हा महामार्ग नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित नसला तरी शहर सुशोभिकरणाच्या दृष्टीने या महामार्गाच्या दोन्ही बाजूस आकर्षक सुशोभिकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. नवी मुंबईतून प्रवास करणा-या प्रवाशांना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून प्रवास करीत असल्याचे जाणवले पाहिजे अशा रितीने सुशोभिकरणाची कामे करण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
सुशोभिकरणामध्ये भुमिगत व उच्चस्तरीय जलकुंभ, स्ट्रॉम वॉटर ड्रेनची झाकणे, बेलॉर्ड यांच्यावरील चित्रकाम, कारंजे, व्हर्टीकल गार्डन यांची रचना यामध्ये वैविध्यपूर्णता आणण्याच्या व त्यांची व्यापक स्वरूपात निर्मिती करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. सायन पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाली असून त्यामध्ये नवी मुंबईच्या लौकीकाला साजेसे बदल करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. स्थापत्य, विद्युत व उद्यान या तिन्ही विभागांनी परस्पर समन्वय राखून ज्याप्रमाणे दर्जेदार निर्मिती होईल त्याचप्रमाणे त्याची देखभालही सुव्यवस्थित राहील याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी कटाक्षाने सूचित केले.
'निश्चय केला, नंबर पहिला' हे आपले ब्रीदवाक्य कायम असून लोकसहभाग वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. 'माझं शहर - माझा सहभाग' या आपल्या संकल्पनेस अनुसरून घरोघरी कचरा वर्गीकरण, वर्गीकृत कचरा संकलन, खत निर्मिती प्रकल्प संचलन अशा विविध बाबींकडे काटेकोर लक्ष देतानाच सी ॲण्ड डी प्लांटची सुविधा पूर्ण क्षमतेने वापरली जाण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. रस्त्यावर कचरा दिसता कामा नये याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देशित करतानाच महानगरपालिकेकडे प्राप्त होणा-या स्वच्छता विषयक तक्रारींचे तत्परतेने निराकरण करण्यात जराही निष्काळजीपणा करू नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
प्लास्टिक प्रतिबंधाकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याचे सूचित करीत आयुक्तांनी ब-याच दिवसांपासून रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलून क्षेपणभूमीवर नेण्याची कार्यवाही काटेकोरपणे करावी असे निर्देशित केले. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेमध्ये अग्रक्रम मिळविण्याची क्षमता असणारे शहर असून राज्य व राष्ट्रीय पातळीवर फार मोठ्या अपेक्षेने नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाहिले जाते. ही जबाबदारी ओळखून आपण प्रत्येकाने स्वच्छतेबाबत सतर्क राहणे गरजेचे असून स्वच्छता कार्यात नागरिकांच्या सहभागावर अधिक भर देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज यावेळी आयुक्तांनी व्यक्त केली व यापुढील बैठकीत प्रत्येक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलेल्या कामाचा आढावा सादर करण्याचे सूचित केले.
Published on : 17-12-2021 11:01:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update