स्वच्छता सवयीच्या '21 दिवस चॅलेंज' ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट आहे हे लक्षात घेऊन स्वच्छतेची सवय लागावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "स्वच्छता सवयीचे 21 दिवस चॅलेंज (#21DAYSCHALLENGE) या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कोणतीही गोष्ट सातत्याने 21 दिवस करत राहिली तर त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते हे लक्षात घेऊन हा स्वच्छतेशी संबंधित अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला असून 19 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत राबविण्यात येणा-या या स्वच्छता चॅलेंज उपक्रमामध्ये अनेक नागरिक विशेषत्वाने महिला आणि युवावर्ग उत्साहाने सहभागी झालेला दिसत आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना दररोज करण्यासाठी स्वच्छतेशी संबंधित 5 कृती देण्यात आल्या असून या कृती करून त्याची छायाचित्रे व सेल्फी काढून नियमितपणे 21 दिवस फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्राम पेजवर दररोज अपलोड करावयाची आहेत. छायाचित्रे अपलोड करताना त्यासोबत #21DAYSCHALLENGE आणि #SWACHHNAVIMUMBAI हे 2 हॅशटॅग टाकायचे आहेत तसेच @NMMCONLINE यावर टॅग करावयाचे आहे.
या 5 कृतींपैकी दररोज योग्य कृती आणि त्याचे छायाचित्र अपलोड केल्यानंतर प्रत्येक कृतीला 20 याप्रमाणे 100 गुण दिले जात असून काही बोनस कृती कार्यही सहभागी स्पर्धकांना आठवड्याभराच्या कालावधीत दिले जात आहे.
स्वच्छता चॅलेंजसाठी करावयाच्या 5 कृतींमध्ये - (1) कच-याचे ओला व सुका असे कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणाहून म्हणजे घरापासूनच वर्गीकरण करणे, (2) कम्पोस्ट बास्केट वापरून घरातच ओल्या कच-याचे खतात रूपांतर करणे, (3) प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळणे, (4) कचरा कमी करणे (reduce), कचरा पुनर्उपयोगात आणणे (Reuse), कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) या थ्री आर नुसार कार्यप्रणाली राबविणे, (5) शहर सुशोभिकरणांतर्गत विविध ठिकाणी चितारलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 लोगोसोबत सेल्फी काढणे याचा समावेश आहे.
या 21 दिवसांच्या स्वच्छता चॅलेंज मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणा-या 5 नागरिकांना प्रत्येकी आय फोन 12 मिनी हा मोबाईल फोन बक्षिस स्वरूपात दिला जाणार असून याशिवाय 25 हून अधिक इतर आकर्षक पारितोषिके तसेच 50 गिफ्ट व्हाऊचर्स सुप्रसिध्द गायक, संगीतकार आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्रॅंड अँम्बॅसेडर श्री. शंकर महादेवन यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2021 SS म्युझिकल नाईट मध्ये प्रदान करण्यात येणार आहेत.
मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशातील तिसरा नंबर उंचावत पहिला नंबर येण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका वाटचाल करीत असताना त्यामध्ये नागरिकांचे योगदान सर्वाधिक महत्वाचे आहे. त्याकरिता स्वच्छता ही नागरिकांची नियमित सवय व्हावी या उद्देशाने "स्वच्छता सवयीचे 21 दिवस चॅलेंज (#21DAYSCHALLENGE) सारखा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. 11 मार्चपर्यंत जरी हा उपक्रम असला तरी अगदी आजपासूनही यामध्ये स्वच्छताप्रेमी नागरिक सहभागी होऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यात सहभागी होण्याचे व त्यानंतरच्या कालावधीतही स्वच्छतेचे 21 दिवस चॅलेंज स्विकारून स्वच्छतेची सवय अंगिकारण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Published on : 08-03-2021 14:00:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update