‘21 डेज चॅलेंज - थ्री आर’ उपक्रमात सर्वोत्तम कामगिरीसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज
केंद्र सरकारने ‘21 दिवस चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम दि.15 मे ते 05 जून या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले असून यामध्ये ‘थ्री आर’ ही मुख्य संकल्पना आहे. ‘थ्री आर’ अर्थात – कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) असून या उपक्रमांतर्गत शहरामध्ये ‘थ्री आर’ सेंटर्स सुरु करणे व नागरिकांच्या सहयोगातून विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. यातील विशेष बाब म्हणजे स्वच्छतेविषयी जागरुक असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने याविषयीच्या कार्यवाहीला आधीपासूनच सुरुवात केलेली आहे असे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी ‘21 डेज चॅलेंज’ साठी नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसह सज्ज असल्याचे सांगितले.
महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये आयोजित विशेष समारंभात ‘21 डेज चॅलेंज’ अंतर्गत ‘थ्री आर’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. अनंत जाधव, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने ‘थ्री आर सेंटर्स’ ही संकल्पना यापूर्वीच शहरातील विविध विभागात 92 ठिकाणी राबविण्यास सुरुवात केली असून ‘नको असेल ते द्या व हवे असेल ते घ्या’ या संकल्पनेवर आधारित या सेंटर्संना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सुरु असलेल्या सेंटर्सच्या कार्यप्रणालीमध्ये जाणवलेल्या काही त्रुटी दूर करून उपक्रम कालावधीत ही सेंटर्स अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
‘थ्री आर’ चे महत्व नव्या पिढीत अर्थात विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आधीपासूनच कृतीशील असून त्यादृष्टीने ‘ड्राय वेस्ट बँक’ सारखा अभिनव उपक्रम शाळांमध्ये राबविला जात आहे. सध्या बेलापूर विभागातील 6 शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक स्वरुपात राबविण्यास सुरुवात झालेली असून या उपक्रमास विद्यार्थी व पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यापुढील काळात हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
याशिवाय बिसलरी कंपनीसोबत ‘बॉटल फॉर चेंज’ हा अभिनव उपक्रम, ‘एच ॲन्ड एम’ व काही इतर इंटरनॅशनल ब्रँडसोबत जुने कपडे घेऊन ग्राहकांना नवीन कपडे खरेदी करताना किंमतीवर सवलतीच्या रुपात पॉईंट्स देण्याची अभिनव संकल्पना मागील काही वर्षांपासून नवी मुंबईत यशस्वीपणे राबविली जात असल्याचेही ते म्हणाले.
सर्वात महत्वाचे म्हणजे झोपडपट्टयांमधील कच-याचे संकलन करुन त्याची तेथेच विल्हेवाट लावणारा ‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल’ हा प्रकल्प 5 झोपडपट्टयांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविला जात असून त्याची इतर झोपडपट्टयांमध्ये व गावठाण भागात अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. या संकल्पनेस राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘21 डेज् चॅलेंज’ उपक्रमांतर्गत नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, सफाईमित्र, बचतगट, TULIP INTERNS, प्रसारमाध्यमे यांचा मोठया प्रमाणावर सहभाग घेतला जाणार असून उपक्रमाशी सुसंगत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर’ हे घोषवाक्य घेऊन केंद्र सरकारमार्फत ‘21 डेज् चॅलेंज’ – ‘थ्री आऱ’ हा उपक्रम जाहीर करण्यापूर्वीपासूनच नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत त्यादृष्टीने अनुषांगिक कार्यवाही केली जात असून यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळत आहे. त्यामुळे 15 मे ते 05 जून या कालावधीत ‘थ्री आर’ उपक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्व नवी मुंबईकर मिळून सर्वोत्तम कामगिरी करूया असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी यावेळी केले.
Published on : 18-05-2023 13:23:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update