*उद्या 22 मार्चपासून सानपाडा नागरी आरोग्य केंद्रातही होणार कोव्हीड 19 लसीकरण*
पहिल्या टप्प्यात आरोग्यकर्मी आणि दुस-या टप्प्यात पोलीस, सुरक्षा असे पहिल्या फळीतील कोरोना योध्दे यांच्यानंतर तिस-या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील सहव्याधी (कोमॉर्बीड) असणारे नागरिक यांच्या कोव्हीड 19 लसीकरणाला सुरूवात झालेली असून लाभार्थी नागरिकांना लसीकरणासाठी कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर बारकाईने लक्ष देत आहेत. आपल्या स्वच्छताविषयक पाहणी दौ-यांमध्ये ते लसीकरण केंद्रांना भेटी देत असून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या सूचना, अभिप्राय जाणून घेत आहेत.
महापालिका क्षेत्रात कार्यान्वित महानगरपालिकेच्या 22 आणि खाजगी 15 लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी काल शनिवारी 20 मार्चपासून एक्स्पोर्ट हाऊस, सेक्टर 19, तुर्भे येथील जम्बो लसीकरण केंद्राची भर टाकण्यात आलेली आहे. या जम्बो लसीकरण केंद्रात सध्या 4 बूथ कार्यानिवत करण्यात आलेले असून ते सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 अशा दोन सत्रात नागरिकांच्या सेवेत असणार आहेत. आजपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील 67,273 नागरिकांचे कोव्हीड 19 लसीकरण झालेले आहे.
यामध्ये आणखी महत्वाची भर घालत उद्या सोमवार, दि. 22 मार्चपासून सानपाडा नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्यात येत आहे. आयुक्तांच्या तुर्भे विभागातील पाहणी दौ-यामध्ये नागरिकांशी संवाद साधताना सानपाडा भागातील लाभार्थी नागरिकांना लसीकरणासाठी त्याच क्षेत्रात लसीकरण केंद्र उपलब्ध होणे गरजेचे आहे हे त्यांना जाणवले. याबाबत आयुक्तांनी याठिकाणी लसीकरण सुरू करणेबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले. त्यास अनुसरून सानपाडा नागरी आरोग्य केंद्रात सोमवार दि. 22 मार्च 2021 पासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्तींचे लसीकरण सुरू असून त्यांनी आपल्या नजिकच्या कोव्हीड लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 22-03-2021 14:25:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update