*25 जून रोजी साहित्यिक डॉ.विजय चोरमारे यांचे ‘आधुनिक क्रांतीचे राजर्षि’ या विषयावर व्याख्यान*
पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील जडणघडणीमध्ये राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या अतुलनीय कार्याचे अनमोल योगदान आहे. हे वर्ष छत्रपती शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने दि. 25 जून 2022 रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला ‘आधुनिक क्रांतीचे राजर्षि’ या विषयावर सुप्रसिध्द साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाच्या राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिताचे सदस्य सचिव डॉ विजय चोरमारे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15, ऐरोली येथे उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या विचारसूत्रावर आधारित वाड्.मयीन स्मारक म्हणून नावाजले जात असून या ठिकाणी विविध विषयांवर नामवंत वक्त्यांची व्याख्यांने आयोजित करुन नागरिकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करुन दिली जात आहे. ‘विचारवेध’ अंतर्गत कार्यक्रमांना तसेच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित आयोजित ‘जागर’ या विशेष व्याख्यानमालेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे.
हरितक्रांती, शिक्षणक्रांती, समताक्रांती, उद्योगक्रांती, जलक्रांती, श्वेतक्रांती घडवित आधुनिक विज्ञाननिष्ठ समाजक्रांतीचे उद्गाते असणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वस्पर्शी कार्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांचे विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य जाणून घेण्यासाठी दिनांक 25 जून 2022 रोजी, सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सायं. 7 वा. आयोजित ‘आधुनिक क्रांतीचे राजर्षि’ या व्याख्यानाप्रसंगी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 22-06-2022 13:24:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update