*अंथरूणाला खिळलेल्या 279 बेडरिडन रूग्णांनाही कोव्हीड लसीकरणाव्दारे संरक्षण*
कोव्हीडपासून नवी मुंबईकर नागरिक लवकरात लवकर संरक्षित व्हावेत याकरिता लस उपलब्धतेनुसार लसीकरणाला गती दिली जात असताना कोणताही समाजघटक यापासून दुर्लक्षित राहू नये याकरिता विशेष लक्ष दिले जात आहे. यामध्ये बेघर, निराधार नागरिक ते तृतीयपंथीय, रेडलाईट एरिया तसेच दुर्गम दगडखाणी क्षेत्रातील नागरिकांसाठीही लसीकरणाच्या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
*कोव्हीड लसीकरणामध्ये आजारपणामुळे अथवा वृध्दापकाळामुळे अंथरूणाला खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणा-या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू शकतात हे लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार जून महिन्यापासूनच अशा व्यक्तींच्या घरी जाऊन लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. या विशेष उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 279 बेडरिडन रूग्णांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आलेले आहे. याशिवाय विविध वृध्दाश्रमांतील 381 व्यक्तींचेही कोव्हीड लसीकरण करण्यात आलेले आहे.*
बेडरिडन रूग्ण लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकरिता दक्ष राहून कार्यवाही करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांना आयुक्तांमार्फत निर्गमित करण्यात आले होते. त्यास अनुसरून सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील बेडरिडन रूग्णांची माहिती ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ए.एन.एम.) व आशा वर्कर यांच्यामार्फत संकलित केली व त्यास अनुसरून घरोघरी लसीकरणास सुरूवात केलेली आहे. शासकीय निर्देशानुसार या बेडरिडन व्यक्तींना कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत असून या लसीकरणाकरिता त्या बेडरिडन रूग्णावर उपचार करीत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र घेण्यात येत आहे तसेच लसीकरणासाठी त्या बेडरिडन व्यक्तीचे संमतीपत्र घेण्यात येत आहे.
*कोव्हीड लसीकरणापासून कोणताही सामाजिक घटक दुर्लक्षित राहू नये याची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काळजी घेतली जात असून एखाद्या कुटुंबात बेडरिडन रूग्ण असल्यास त्यांच्या लसीकरणासाठी कुटुंबियांनी आपल्या नजिकच्या महापालिका नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अथवा महानगरपालिकेच्या कोव्हीड कॉल सेंटरवर 022-27567460 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून बेडरिडन रूग्णाची माहिती द्यावी व आपल्या कुटुंबातील बेडरिडन रूग्णांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
Published on : 03-09-2021 11:46:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update