एकाच वेळी 326 जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांचा कर्मचारीहिताय निर्णय
.jpeg)
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे तसेच त्यांची पदोन्नती असे महत्वाचे विषय महापालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार मागील दीड वर्षापासून विशेष लक्ष देत प्रशासन विभागामार्फत मार्गी लावण्यात येत आहेत.
याच धर्तीवर विविध संवर्गातील तब्बल 326 नमुंमपा कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी हा लाभ देत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी जणू कर्मचा-यांना दस-याची भेटच दिली असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचारीवर्गातून उमटत असून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचा विशेष विचार करण्यात आलेला आहे.
मागील दीड वर्षात विविध संवर्गातील 866 महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली असून यामध्ये आता 17 संवर्गातील 326 कर्मचा-यांची भर पडलेली आहे. अशाप्रकारे एकूण 1192 अधिकारी, कर्मचारी यांना 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेला आहे.
यामध्ये – 11 अग्निशमन प्रणेता, 4 दूरध्वनी चालक, 3 लेखाधिकारी, 63 कक्षसेवक / कक्षसेविका, 1 व्यवसाय शिक्षक, 1 चित्रकला शिक्षक, 2 संगणक शिक्षक, 1 संगीत शिक्षक, 35 शिपाई, 30 सफाई कामगार, 2 सहाय्यक प्लंबर, 15 स्मशानभूमी रक्षक (वॉचमेन), 141 स्टाफ नर्स, 3 स्त्री रोग तज्ज्ञ, 8 बालरोग तज्ज्ञ, 5 प्रयोगशाळा सहाय्यक, 1 डायलिसीस तंत्रज्ञ अशा 326 कर्मचा-यांचा समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच स्वच्छतेसह इतर अनेक सुविधांमध्ये देशातील एक अग्रगण्य शहर म्हणून ओळखले जाते. या नावलौकिकात येथील अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या कामाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारीवृंदाला त्यांचे सेवेतील नियमानुसार मिळणारे लाभ देणे त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करताना देणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने कर्मचारी कल्याणकारी कामांकडेही लक्ष देण्याचे प्रशासन विभागास सूचित केले असून त्यानुसार हे लाभ देण्यात येत असल्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
या कार्यवाहीत आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार तसेच प्रशासन विभागाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
Published on : 25-10-2023 07:40:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update