एकाच वेळी 330 दिव्यांगांना जागा व स्टॉल वाटपाची सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे सुव्यवस्थित संपन्न





दिव्यांगांसाठी लोककल्याणकारी भूमिका जपणारी महानगरपालिका ही नवी मुंबईची ओळख असून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वयंरोजगाराव्दारे आर्थिक बळ देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जागा व स्टॉल उपलब्ध करून देण्याकरिता सोडत (लॉटरी) काढण्यात आली. 3 टप्प्यात अत्यंत पारदर्शक पध्दतीने झालेल्या या सोडतीमध्ये तब्बल 330 दिव्यांग व्यक्तींना सोडतीव्दारे स्टॉलचे वितरण करण्यात आले. सकाळी 11 वाजल्यापासून सायं. 5.30 वाजेपर्यंत साडेसहा तास नॉनस्टॉप चाललेली ही सोडत अत्यंत सुव्यवस्थित रितीने पार पडली. सोडतीनंतर अनेक दिव्यांग व्यक्तींनी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत हा दिव्यांगांसाठी ऐतिहासिक सुवर्णक्षण असल्याची भावना मांडत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर व संबंधीत घटकांचे आभार मानले.
सोडतीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांनी दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने सिडकोकडे करण्यात आलेल्या सातत्याने पाठपुराव्याविषयी तसेच संपूर्ण प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देणे करीता "प्रतीक्षा यादी" तयार करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहीर सूचनेस अनुसरून 714 दिव्यांगाचे अर्ज प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने महापालिका सर्वसाधारण सभा, ठराव क्र. 1521, दि.20 डिसेंबर 2019 अन्वये “प्रतिक्षा यादी” तयार करण्यात आली होती. या प्रतिक्षा यादीला मान्यता देतांना महापालिका सर्वसाधारण सभेने दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देणेकरीता सिडकोकडून जागेची मागणी करुन जागा प्राप्त झाल्यानंतर, लॉटरी पध्दतीने जागा वाटप करण्यास आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायम रहिवाशी दिव्यांगास प्रथम प्राधान्य, त्यानंतर उर्वरित घटकांना जागा वाटपाच्या धोरणास मान्यता दिलेली होती.
त्यानुसार सिडकोकडून जागा प्राप्त करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. सिडकोमार्फत ‘स्टॉल’ या प्रयोजनासाठी राखीव ठेवलेले 14 भूखंड बाजारभावाने उपलब्ध करून घेण्यात आले. यामध्ये ऐरोली विभागात से.6 - भु.क्र. 8B/8G, 2A, 424, से.2E - भु.क्र. 457 तसेच वाशी विभागात से-1, भु.क्र.3-B, 3-B/1, से-17 भु. क्र.85B, 2, 61/13 तसेच सी.बी.डी.बेलापूर विभागात से-15 भू क्र.72-A, 72-B, तसेच नेरुळ विभागात से. 18-A, भु.क्र.153, तुर्भे विभागात सानपाडा से-23, भु.क्र.07 तसेच कोपरखैरणे विभागात से-14 भु.37 तसेच घणसोली विभागात से 4 भू.क्र.526 अशा 14 भूखंडाचा समावेश आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी दिव्यांगाना केवळ जागा न देता स्टॉलसुध्दा उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली.
त्यानंतर, प्रतिक्षा यादीवरील दिव्यांगाकडून दि.02 जून ते 8 जुलै 2022 या कालावधीत हरकती, सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार पूर्वीच्या नमुंमपा क्षेत्रातील कायमस्वरुपी रहिवाशी असलेल्या 171 दिव्यांग व्यक्तींच्या यादीमधील मयत व एकाच कुटुंबातील 05 अर्जदार वगळता 166 अर्जदार तसेच हरकती, सूचनानंतर कायमस्वरुपी यादीमध्ये वर्ग झालेले 164 अर्जदार अशा एकूण 330 दिव्यांगाची जागा, स्टॉल वाटपाची सोडत विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे सर्वांसमक्ष पारदर्शक पध्दतीने संपन्न झाली. याप्रसंगी पात्र झालेल्या दिव्यांगाची त्यांच्या सहाय्यकांसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या सोडतीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती मालमत्ता विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी सादरीकरणाव्दारे विषद केली. विभागनिहाय स्टॉलच्या चिठ्ठ्यांची समान आकाराची गुंडाळी करून त्या पारदर्शक ड्रममध्ये टाकण्यात आल्या व विभागनिहाय यादीतील दिव्यांग व्यक्तीचे नाव जाहीर करून सर्वांसमक्ष शालेय विद्यार्थ्यांमार्फंत एकेका स्टॉलची चिठ्ठी उचलण्यात आली व दिव्यांगाला मिळालेल्या स्टॉलच्या विभागाचे नांव, भूखंड क्रमांक व स्टॉल क्रमांक जाहीर करण्यात आले.
प्रथम फेरीमध्ये बेलापूर-9, नेरुळ-15, वाशी-16, तुर्भे-16, कोपरखैरणे-18, घणसोली-27, ऐरोली-24, व दिघा-11 अशा एकूण 136 जागांचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या फेरीमध्ये बेलापूर-2, नेरुळ-39, वाशी-25, कोपरखैरणे-06, घणसोली-16, ऐरोली-23, व दिघा-07 अशा एकूण 118 जागांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे तुर्भे व कोपरखैरणे येथे उपलब्ध जागांच्या संख्येपेक्षा अर्जदाराची संख्या जास्त असल्याने इतर विभागांमध्ये शिल्लक राहिलेल्या जागा एकत्रित करुन तिसऱ्या फेरीमध्ये तुर्भे-59 व कोपरखैरणे-17 अशा 76 जागांचे वाटप करण्यात आले.
या दिव्यांगाना त्याचवेळी जागा वाटप झाल्याबाबतचे सूचनापत्र देण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी प्रथमत: सन 2003 मध्ये दिव्यांगाना 171 जागा उपलब्ध करुन दिलेल्या होत्या. दिव्यांगाचा सदर करारनामा संपुष्टात आल्यानंतर, सन 2019 मध्ये एकूण 110 दिव्यांगाच्या करारनाम्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे व त्यानंतर आता 330 दिव्यांगाना जागा व स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
दिव्यांगांबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेने जागा व स्टॉल उपलब्ध करून देत त्यांचे सक्षमीकरण करण्याची घेतलेली भूमिका व एकाच वेळी 330 इतक्या मोठ्या संख्येने जागा व स्टॉलचे केलेले वाटप असा देशातील पहिलाच उपक्रम असावा अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत 2019 पासून याकरिता ज्या महापालिका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, संबंधीत अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग कल्याणासाठी काम करणा-या संघटना यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल दिव्यांगांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Published on : 11-11-2022 14:13:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update