*350 हून अधिक चित्रकारांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चित्रांतून आदरांजली*
'जागर 2022' या अभिनव उपक्रमांतर्गत नामवंत साहित्यिक, विचारवंत यांच्या विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करून अनोख्या पध्दतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
या अनुषंगाने बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांवरील अथवा त्यांच्या जीवनचरित्रातील विशेष प्रसंगावरील चित्रे काढून त्यांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण करण्याच्या दृष्टीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बाबासाहेबांना गुरूस्थानी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनानिमित्त आयोजित या चित्रकला स्पर्धेत 350 हून अधिक विविध वयोगटातील चित्रकारांनी सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील स्वामी विवेकानंद उद्यान, सेक्टर 14, ऐरोली येथे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता सकाळी 7 वाजल्यापासूनच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, चित्रकार उत्साहाने उपस्थित होते. प्रशासन व समाज विकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी स्पर्धास्थळी उपस्थित राहून चित्रकारांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेकरिता इयत्ता 8 वी ते 12 वी च्या गटासाठी (1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक विचारांवर आधारित चित्र, (2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातील प्रसंग, (3) बाबासाहेब आणि पुस्तक असे विषय देण्यात आले होते. यामध्ये 317 विद्यार्थ्यांनी सहभागी होत बाबासाहेबांच्या प्रतिमा / विचारांना चित्ररूप दिले.
त्याचप्रमाणे मोठ्या खुल्या गटासाठी देण्यात आलेल्या (1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक विचारांवर आधारित चित्र, (2) बाबासाहेब आणि पुस्तक, (3) बाबासाहेब - ज्ञान हीच शक्ती (Knowledge is Power) या विषयांवर विविध वयोगटाच्या 34 चित्रकारांनी बाबासाहेबांना चित्रांकीत केले. चित्रे काढण्यासाठी 3 तासांचा कालावधी देण्यात आला होता.
स्वामी विवेकानंद उद्यानातील शांत, प्रसन्न व मोकळ्या वातावरणात सकाळच्या वेळी चित्र काढताना खूप आनंद मिळाला अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी व चित्रकारांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर चित्र काढायला मिळणे हे आमच्या दृष्टीने भाग्याचे आहे अशीही प्रतिक्रिया काही चित्रकारांनी दिली.
चित्र काढण्यासाठी आवश्यक कागद व रंगसाहित्य नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनामुल्य पुरविण्यात आले होते. सहभागी चित्रांमधून सर्वोत्कृष्ट चित्रांना अनुक्रमे रु. 10 हजार, रु. 7500/-, रु. 5 हजार व उत्तेजनार्थ अशी पारितोषिके प्रत्येक गटामध्ये दिली जाणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात 13 एप्रिल 2022 रोजी सायं. 7 वा. संपन्न होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवितानाच वाचनाचे वेड जपणारे युवक व्याख्याते हे "युवकांच्या नजरेतून.." या कार्यक्रमांतर्गत "आम्ही वाचलो - तुम्हीही वाचा" या विषयाच्या अनुषंगाने स्वविकासासाठी वाचनाचे महत्व या विषयावर अनुभव कथन करणार आहेत. तरी सहभागी विद्यार्थी व चित्रकारांनी याप्रसंगी आवर्जुन उपस्थित रहावे असे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-04-2022 07:57:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update