*4 ते 11 एप्रिल या कालावाधीत "विशेष मिशन इंद्रधनुष 4.0" लसीकरण मोहिमेची दूसरी फेरी*
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात मार्च 2022 ते मे 2022 या कालावधीत "विशेष मिशन इंद्रधनुष 4.0" च्या तीन मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील प्रथम फेरी 7 मार्च ते 13 मार्च 2022 मध्ये राबविण्यात आली. या मिशनची दुसरी फेरी 4 एप्रिल 2022 पासून राबविण्यात येत आहे.
बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे अतिशय प्रभावी साधन आहे. मात्र अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे. या मोहिमेमध्ये लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
या मोहीमेची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने लसीकरण टास्क फोर्सची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इंडियन मेडीकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ पिडियाट्रीक, एकात्मिक बालविकास विभाग यांचे प्रतिनिधी, सर्व रुग्णालयांचे प्रमुख तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या सभेमध्ये अपेक्षित लाभार्थ्यांच्या यादीपैकी प्रत्येक लाभार्थ्यावर लक्ष केंद्रीत करुन 100% उद्दिष्टपूर्ती करणेकरीता प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत असे सूचित करण्यात आले.
यापूर्वीच या मोहीमेची पहिली फेरी 7 मार्च ते 13 मार्च 2022 या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आली. यामध्ये 65 सत्रांव्दारे 378 गरोदर माता व 1569 बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या मोहिमेमध्ये एकूण 387 गरोदर मातांना व 1529 बालकांना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
शासन निर्देशानुसार या मोहिमेची पुढची दूसरी फेरी 4 एप्रिल ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत राबविण्यात येत असून यासाठी 64 बाहयसत्रे व 5 मोबाईल अशा एकूण 69 सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 371 गरोदर माता व 1325 बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे व लसीकरणाबाबत संबंधीत सर्व कर्मचाऱ्यांचे पुन्हा प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नियमित लसीकरणांतर्गत बीसीजी, बी ओपीव्ही, हिपॅटायटीस बी, पेंटाव्हॅलंट, एफ आयपीव्ही, रोटा, गोवर रुबेला, टीडी, डीपीटी, पीसीव्ही या लसी मोफत देण्यात येत असून प्रत्येक इंजेक्शनकरिता नवीन सिरींज व नीडल वापरण्यात येते. तरी सर्व नागरिकांनी "विशेष मिशन इंद्रधनुष 4.0" अंतर्गत आपल्या पाच वर्षापर्यंतच्या मुलांना लसीकरण करुन संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आयुक्त यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 01-04-2022 16:01:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update