*4 एप्रिल रोजी दिव्यांगांकरिता कोव्हीड लसीकरणाचे विशेष सत्र*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरुवातीपासूनच कोव्हीड लसीकरण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आल्याने प्रभावी रितीने कोव्हीड नियंत्रण करणे शक्य झाले. 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचे दोन्ही डोस 100 टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणातही पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण नवी मुंबई महानगरपालिकेनेच पूर्ण केले.
लसीकरण करताना विशेष घटकांकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे धोरण नवी मुंबई महानगरपालिकेने जपले. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच ज्या व्यक्तींचा सेवा कार्य करताना अधिकाधिक व्यक्तींशी संबंध येतो अशा कोरोना प्रसाराच्या दृष्टीने जोखमीच्या (Potential Super spreaders) व्यक्तींच्या लसीकरणाकडेही विशेष लक्ष देण्यात आले.
सध्या कोरोनाचे प्रतिबंधात्मक निर्बंध शिथील झाले असले तरी कोव्हीड लसीकरण सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असून दुसरा डोस घेणे बाकी असलेल्या नागरिकांनी विहीत वेळेत आपला कोव्हीड लसीचा दुसरा डोस घ्यावा असे आवाहन विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच सुरु झालेल्या 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या जलद लसीकरणावरही भर देण्यात येत आहे.
यामध्ये दिव्यांग मुले व व्यक्ती यांच्याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांकरीता सोमवार दि. 04 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वेळेत सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरुळ व ऐरोली याठिकाणी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या लसीकरण सत्रात 12 ते 14 वयोगटातील दिव्यांग मुलांना कोर्बेवॅक्स लसीची पहिली मात्रा दिली जाणार आहे. तसेच 15 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांकरिता कोव्हॅक्सिन लसीची पहिली व दुसरी मात्रा उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे 18 ते 59 वयोगटातील दिव्यांग नागरिकांकरिता कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड लसीची पहिली व दुसरी मात्रा उपलब्ध आहे आणि 60 वर्षावरील दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांकरिता कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन्ही लसीची पहिली व दुसरी मात्रा तसेच प्रिकॉशन डोस देखील उपलब्ध असणार आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग मुले व व्यक्तींनी या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घेऊन 4 एप्रिल रोजी आपल्या वयानुसार योग्य लस घ्यावी तसेच दुसरा डोस अथवा प्रिकॉशन डोस घेताना पहिला डोस ज्या लसीचा घेतलेला आहे त्याच लसीचा दुसरा डोस व प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 01-04-2022 16:17:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update