घणसोलीत 450 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त करीत 10 हजार दंडवसूली
प्लास्टिकमुळे होणारी हानी लक्षात घेऊन नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळणेबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियमित जनजागृती करण्यात येत आहे. तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात कारवाईदेखील केली जात आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचेमार्फत याबाबत नियमित बैठकीत आढावाही घेतला जात आहे.
या अनुषंगाने घणसोली विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली तेथील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक आणि समुहाने धडक कारवाई करून सेक्टर 3 येथील पुजा एन्टरप्राईजेसच्या गोडाऊनवर धाड टाकत प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त केला. यामध्ये 450 किलोहून अधिक प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या प्लेट, चमचे, कंटेनर असा प्लास्टिक साठा जप्त करीत 10 हजार रक्कमेची दंडवसूलीही करण्यात आली.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली ही कार्यवाही करण्यात आली. एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याबाबत केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना जाहीर केली असून सुधारित घनकचरा व्यवस्थापन नियम – 2016 अन्वये पॉलिस्टीन आणि विस्तारित पॉलिस्टिरीनसह सिंगल यूज प्लास्टिकलाही बंदी घालण्यात आली आहे. या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास पहिल्या गुन्ह्याच्या वेळी रु. 5 हजार, दुस-यांदा गुन्हा घडल्यास रु. 10 हजार आणि तिस-या गुन्हाच्या वेळी रु. 25 हजार व तीन महिन्यांचा कारावास असे कारवाई करण्यात येत आहे.
तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या भविष्याच्या व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णत: टाळावा नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 12-07-2023 09:52:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update