*9500 हून अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र*
‘निश्चय केला - नंबर पहिला’ या ध्येयाने प्रेरित होऊन नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी सज्ज झालेले आहे. या अनुषंगाने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023' अंतर्गत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातील स्वच्छ चित्रकला स्पर्धेचा उपक्रम 9500 हून अधिक विद्यार्थी चित्रकारांनी स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र रेखाटत यशस्वी केला.
सेक्टर 14 कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये सकाळी 7 वा. आधीपासूनच शाळानिहाय विद्यार्थ्यांचे समुह स्पर्धास्थळी रांगेने उपस्थित राहण्यास सुरुवात झाली होती. याठिकाणच्या मोकळ्या व निसर्गरम्य तसेच सकाळच्या वेळेतील काहीशा थंड वातावरणात विद्यार्थ्यांची 8000 इतकी अपेक्षित उपस्थिती वाढली आणि 9500 हून अधिक विद्यार्थी चित्रकला स्पर्धेसाठी उत्साहाने सज्ज झाले.
अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उप आयुक्त श्री. योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. माजी नगरसेवक श्री. शिवराम पाटील यांनीही स्पर्धास्थळी भेट दिली.
चित्रकला स्पर्धेकरिता माझे शहर – माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि 3R (Reduce, Reuse, Recycle) हे 3 विषय देण्यात आले होते. या विषयांवर 9500 हून अधिक विद्यार्थ्यांनी व चित्रकारांनी आपल्या मनातील स्वच्छ नवी मुंबईचे चित्र रेखाटले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट 3 चित्रांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार असून 100 सर्वोत्तम चित्रांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रे प्रदान कऱण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये लोकसहभागावर भर दिला जात असून चित्रकला स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद हा उत्साह वाढविणारा असून अंगभूत चित्रकलेला उत्तेजन देणारा व शहर स्वच्छतेविषयी जबाबदारी व दायित्व प्रदर्शित करणारा असल्याचे मत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त करीत सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.
Published on : 24-11-2022 11:43:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update