1 ऑगस्ट रोजी डॉ. सोमनाथ कदम व्याख्यानातून मांडणार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा साहित्य प्रवास
श्रमिक, कष्टकरी, वंचितांच्या जगण्याला आपल्या साहित्यामधून ताकदीने मांडणारे व समाजाला नवी दिशा देणारे थोर लेखक, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सेक्टर 15, ऐरोली येथे सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते डॉ. प्रा. सोमनाथ कदम यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाबासाहेबांच्या ज्ञान हीच शक्ती या प्रेरणादायी संदेशाला मूर्तिमंत स्वरूप देण्यासाठी ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सातत्याने विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जात असून या माध्यमातून वैचारिक जागर केला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक जगातील बाबासाहेबांच्या कोणत्याही स्मारकापेक्षा आगळेवेगळे असल्याचे मत येथे भेट देणा-या देशापरदेशातील अनेक स्मारके पाहिलेल्या मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केले आहे. येथील अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज ग्रंथालय हा स्मारकाचा आत्मा असून त्यामुळे या स्मारकाचा ज्ञानस्मारक असा गौरव सर्वत्र केला जात आहे.
‘विचारवेध’ या शिर्षकांतर्गत स्मारकामध्ये सातत्याने व्याख्यान परंपरा जपली जात असून मंगळवार, दि. 1 ऑगस्ट रोजीच्या अण्णाभाऊंच्या 103 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समाज’ या विषयावर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आधारित ज्यांची पुस्तके प्रकाशित आहेत असे सुप्रसिद्ध लेखक डॉ. सोमनाथ कदम हे अण्णा भाऊंच्या साहित्यामधून उमटलेले समाजाचे व्यापक प्रतिबिंब उलगडवून दाखविणार आहेत.
अण्णा भाऊंनी आपल्या अल्पायुष्यात 21 कथासंग्रह आणि 30 कादंबऱ्या व असंख्य लोकगीते, कवने लिहून शोषितांचे संघर्षमय व दु:खमय जीवन साहित्यातून मांडले. त्यांच्या सात कादंबऱ्यावर निघालेले चित्रपट अतिशय गाजले. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. ही कादंबरी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील अण्णा भाऊंच्या ‘माझी मैना गावाकडं राहिली’ या लोकगीताने आंदोलनाची धार जनमानसात रूजविली.
ज्ञानपीठकार साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी अण्णा भाऊंबद्दल गौरवोद्गार काढताना म्हटले आहे की, “अण्णाभाऊंच्या लेखणीला प्रतिभेच देणे लाभले आहे. जीवनात आग ओंकणाऱ्या हरत-हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांनी फार भोगले आहे. त्यातूनच पोटतिडकीने लिहिणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचे पूजक आहेत.” अशा केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या मात्र जगाच्या शाळेत अनुभवांचे व्यापक शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू मानून वास्तववादी साहित्यनिर्मिती केली त्यामुळे जगभरात त्यांचा गौरव झाला.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि कणकवली महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रा. सोमनाथ कदम हे मंगळवार दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी, सायं. 7 वा. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णा भाऊंचा व्यापक साहित्य आलेख विशेष व्याख्यानातून मांडणार असून याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली-मुलुंड खाडीपूलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली येथे श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-07-2023 12:28:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update