1 ऑक्टोबरला ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरून करणार एक साथ, एक तास श्रमदान

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत नुकतेच 17 सप्टेंबरला सकाळी ठीक 8 वा. शहराच्या 8 विभागांत 1 लाख 14 हजार इतक्या मोठ्या संख्येने नवी मुंबईकर नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली, ज्याची विक्रमी नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली.
अशाच प्रकारचा आणखी एक विशेष उपक्रम मा. पंतप्रधान महोदय यांच्या देशव्यापी आवाहनानुसार रविवार, दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी, सकाळी ठीक 10 वाजता एकाच दिवशी एकाच वेळी नागरिकांनी आपापल्या विभागात एकत्र येऊन स्वच्छतेसाठी श्रमदान करून यशस्वी करावयाचा आहे. याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनीही हा उपक्रम म्हणजे लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या अनुषंगाने स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने हा ‘स्वच्छांजली’ उपक्रम भव्यतम स्वरूपात आयोजनाकरिता तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार याव्दारे स्वच्छतेची लोकचळवळ उभी रहावी या हेतूने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा तब्बल 267 ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले आहे. या ठिकाणांची माहिती महानगरपालिकेची वेबसाईट, फेसबुक पेज यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सदर उपक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मायक्रोप्लॅनींग करण्यात आले असून आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठका झालेल्या आहेत. शासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी या संपूर्ण नवी मुंबई शहराला सामावून घेणा-या स्वच्छांजली उपक्रमाच्या भव्यतम आयोजनासाठी सक्रिय कार्यरत आहेत.
नवी मुंबईकर नागरिकांनी रविवार, दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी, सकाळी 10 वा. एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याकरिता द्यावा आणि स्वच्छतेविषयी असलेली आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी तसेच नवी मुंबई शहराप्रती असलेले प्रेम व्यक्त करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने नागरिकांकरिता विविध माध्यमांतून करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे ‘स्वच्छता’ ही सेवा उपक्रमात प्रत्येक नागरिकाने भारत सरकारच्या https:/swachhatahiseva.com/ या वेब पोर्टलवर आपल्या नावाची नोंद करून या उपक्रमात सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आलेले आहे.
स्वच्छता ही सेवा उपक्रमात क्यू आर कोड व्दारे अथवा वेब पोर्टलवर नोंदणी करून सहभागी होण्याकरिता आवाहन करणारे सेल्फी स्टॅड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रामुख्याने श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांवर या सेल्फी स्टॅडसोबत फोटो काढण्याचा अनेकांनी आनंद घेतला.
या सहभाग नोंदणी प्रक्रियेत https:/swachhatahiseva.com/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक गुगल फॉर्म प्रदर्शित होतो. त्यामध्ये आपले नाव, पुरूष / स्त्री तपशील, भौगोलिक स्थान (URBAN), राज्य, जिल्हा, शहर अशी माहिती दाखल करून आपला एक सेल्फी फोटो काढून दाखल (SUBMIT) करावयाचा आहे. त्यानंतर काही क्षणातच आपणास आपले सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईनच प्राप्त होणार आहे. अशाच प्रकारे क्यू आर कोड स्कॅन करूनही नाव नोंदणी केली जाऊ शकते व आपले सहभाग प्रमाणपत्र प्राप्त केले जाऊ शकते.
संपूर्ण नवी मुंबई शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा हा उपक्रम असून नवी मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने 1 ऑक्टोबरला या विशेष स्वच्छता मोहीमेत सहभागी होत पुन्हा एकवार नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था व मंडळे यांचे प्रतिनिधी, महिला संस्था व महिला बचत गटांचे प्रतिनिधी, शाळा महाविद्यालये यांचे विद्यार्थी व शिक्षक आणि पालक, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करीत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रत्येक नागरिकाने स्वच्छता ही आपली जबाबदारी मानून 267 नियोजित ठिकाणांपैकी आपल्या घराजवळल असलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे आणि शहर स्वच्छतेसाठी एकत्रित योगदान दयावे असे आवाहन केले आहे.
Published on : 29-09-2023 13:32:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update