10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा वाशीत
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होतकरू व उदयोन्मुख कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करण्याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध कला व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असते. अशा स्पर्धांचे आयोजन करत असताना स्थानिक कलाकारांना राज्य पातळीवरील नामांकीत कलाकाराचा अभिनय देखील अनुभवता यावा या संकल्पनेतून 10 ते 12 फेब्रुवारी 2020 या कालावधीत “नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2019-2020” चे आयोजन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2019-2020 मध्ये नवी मुंबईसह राज्यातील नामांकीत संस्था, समुहांच्या 21 एकांकिका सादर होणार आहेत. या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरी नसल्याने सर्व 21 एकांकिका अंतिम फेरीसारख्या प्रत्यक्ष प्रयोग स्वरूपात सादर होणार आहेत, त्यामुळे नाट्यसंस्थांमध्ये खरी चुरस आहे. विशेष म्हणजे या 21 एकांकिकांमध्ये 9 एकांकिका नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संस्थांचे कलावंत सादर करणार आहेत. त्यामुळे राज्य स्तराप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकांकिकांकरिता स्वतंत्र पारितोषिके असणार आहेत. पारितोषिकांचे स्वरूप रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. थेट प्रयोग स्वरूपात सादर होणा-या या एकांकिका स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. पुरुषोत्तम बेर्डे, सुप्रसिध्द अभिनेते श्री. विजय पाटकर व नामांकीत अभिनेत्री श्रीम. पल्लवी पाटील करणार असून त्यादृष्टीनेही ही स्पर्धा लक्षणीय आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकेस नवी मुंबई महापौर राज्यस्तरीय करंडक रू. 50 हजार रक्कमेच्या पारितोषिकासह प्रदान केला जाणार असून व्दितीय क्रमांकास रू. 30 हजार आणि तृतीय क्रमांकास रू. 15 हजार रक्कमेची पारितोषिक प्रदान केली जाणार आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट एकांकिकेस रु. 11 हजार इतकी पारितोषिक रक्कम प्रदान करण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा व वेषभूषा अशी वैयक्तिक स्वरुपातील प्रथम रू. 2 हजार, व्दितीय रू. 1500/- व तृतीय रू. 1 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येतील असे नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी जाहीर केले आहे.
नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2019-2020 चा शुभारंभ दि. 10 फेब्रुवारी 2020 रोजी सायं. 5 वा. तसेच पारितोषिक वितरण समारंभ दि. 12 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. संपन्न होणार आहे. तरी 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत सकाळी 10 ते सायं. 7 वाजेपर्यंत चालणा-या या स्पर्धेमध्ये नवी मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड, पालघर, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या राज्याच्या कानाकोप-यातुन आलेल्या दर्जेदार एकांकिका पाहण्यासाठी शहरातील कलाप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी के. नाथ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 10-02-2020 12:16:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update