11 खाजगी रूग्णालयांकडून कोव्हीड उपचार देयकांमधील अधिकचे 32 लाख परत करून रूग्णांना दिलासा शासनमान्य दरानेच उपचार करण्याचा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा खाजगी रूग्णालयांना इशारा
कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक विविध उपायोजनांची अंमलबजावणी करतानाच कोरोना बाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांच्या लक्षणांनुसार सी.सी.सी., डी.सी.एच.सी. व डी.सी.एच. स्वरूपाच्या त्रिस्तरीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याठिकाणी बेड्स उपलब्धतेसाठी अडचण होऊ नये यादृष्टीने www.nmmchealthfacilities.com या लिंकव्दारे 'रिअल टाईम अपडेटेड डॅशबोर्ड' कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे, महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या दि. 21 मे 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड बाधितांवर होणा-या उपचारांची देयक रक्कम आकारली जावी याबाबतचे आदेशही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 'हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)' यांना दि. 18 ऑगस्ट 2020 रोजी दिलेले आहेत.
तथापि काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचेकडून महानगरपालिकेस प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी अशा तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी अतिरिक्त आयुक्त (1) यांच्या अध्यक्षतेखाली, विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या वतीने देयकांच्या पडताळणीमध्ये प्रथमदर्शनी दोष आढळलेल्या 10 खाजगी रूग्णालयांना महानगरपालिकेमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या.
नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने देयके व कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात येऊन, एकूण रू. 32,00,422/- मात्र इतकी देयकांमध्ये विसंगती आढळलेली रक्कम नागरिकांना परत करण्यात आलेली आहे वा एकूण देयक रक्कमेतून कमी करण्यात आलेली आहे अथवा परतावा प्रस्तावित केलेला आहे. यामध्ये,
पी.के.सी. रूग्णालय, वाशी यांचेकडून 7 रूग्णांची रू. 4,07,000/-,
एम.पी.सी.टी. रूग्णालय सानपाडा यांचेकडून 1,06,000/-,
एम.जी.एम. रूग्णालय सी.बी.डी.बेलापूर यांचेकडून 2 रूग्णांची रू. 1,01,000/-,
फोर्टीज रूग्णालय वाशी यांचेकडून 2 रूग्णांची रू. 3,28,000/-,
डॉ.डी.वाय.पाटील रूग्णालय नेरूळ यांचेकडून 5 रूग्णांची रू. 7,04,675/-,
रिलायन्स रूग्णालय कोपरखैरणे यांचेकडून रू. 1,80,000/-,
ग्लोबल हेल्थ केअर, वाशी यांचेकडून रू. 50,786/-,
तेरणा रूग्णालय नेरूळ यांचेकडून रू. 75,000/-,
सनशाईन रूग्णालय, नेरूळ यांचेकडून 2 रूग्णांची रू. 2,06,000/-
रक्कम रूग्णांच्या देयकातून कमी करण्यात आलेली आहे.
तसेच, अपोलो रूग्णालय, सीबीडी बेलापूर यांचेकडून एका तक्रारीत रू. 2,05,370/-,
आणि दुस-या तक्रारीत रू. 4,03,000/-,
राजपाल रूग्णालय, कोपरखैरणे यांचेकडून रू.1,03,500/-
ग्लोबल हेल्थ केअर, वाशी यांचेकडून रू. 1,15,202/-
रिलायन्स रूग्णालय, कोपरखैरणे यांचेकडून रू. 2,14,889/-
रक्कम रूग्णांस परतावा करण्याचे संबंधित रूग्णालयांस निर्देशित करण्यात आलेले आहे.
अशाप्रकारे, देयकांमध्ये विसंगती आढळलेली एकूण रू. 32,00,422/- मात्र रक्कम नागरिकांना परत करण्यात आलेली आहे किंवा एकूण देयक रक्कमेतून कमी करण्यात आलेली आहे अथवा त्या रक्कमेचा परतावा प्रस्तावित केलेला आहे.
यासोबत प्रत्येक खाजगी रूग्णालयांकरिता महानगरपालिकेमार्फत समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला असून याविषयी अधिक प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 उपचार करणा-या सर्व रूग्णालयांमध्ये जाऊन देयकांची पडताळणी करण्याकरिता विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही विशेष पथके महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड रूग्णालयांमधील कोव्हीड 19 चा प्रसार सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतील देयकांची पडताळणी करणार आहेत.
या पडताळणीमध्ये दि. 21/5/2020 रोजीच्या शासन अधिसूचनेत नमूद दरांचे उल्लंघन करून अवाजवी रक्कम आकारण्यात आल्याचे व रूग्णांची पिळवणूक झाल्याचे रूग्णालयीन देयके लेखा परीक्षण विशेष समितीच्या निदर्शनास आल्यास ती अवाजवी आकारलेली रक्कम जरी रूग्णाने देयकामध्ये अदा केलेली असेल तरी ती रूग्णास परतावा करण्याबाबतचे निर्देश तात्काळ देण्यात येतील असे आयुक्तांनी निर्देशित केलेले आहे.
तसेच पडताळणी दरम्यान एखाद्या रूग्णालयाकडून देयकांमध्ये वारंवार विसंगती केल्याचे आढळून आल्यास व त्यामधून रूग्णाची आर्थिक पिळवणूक होत असल्यास अशा रूग्णालयांवर साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 मधील कलम 3 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 अन्वये आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांना खाजगी रूग्णालयांमध्ये केलेल्या कोव्हीड 19 वैद्यकीय उपचारांविषयी देयकांबाबतच्या तक्रारी सुलभ रितीने दाखल करता याव्यात याकरिता महापालिका मुख्यालयात "कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Centre)" कार्यान्वित करण्यात आले असून 022-27567389 हा हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स ॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
खाजगी रूग्णालयात उपचार करताना ते शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच करणे रूग्णालयांना बंधनकारक असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊन नागरिकाची आर्थिक पिळवणूक होऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका दक्ष आहे. तरी नागरिकांनी खाजगी रूग्णालयातील कोव्हीड 19 विषयी देयकांबाबतची कोणतीही तक्रार महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर करावी असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 13-09-2020 20:02:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update