125 स्वच्छता वाहनांवर झळकलेल्या छायाचित्रांतून स्वच्छतादूतांचा अनोखा सन्मान अशा आगळ्यावेगळ्या प्रकारे सन्मान करणारी नवी मुंबई पहिलीच महानगरपालिका
स्वच्छतेमध्ये नेहमीच देशातील मानांकन उंचाविणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक असताना या मानांकनामध्ये दैनंदिन शहर स्वच्छतेत मोलाचे योगदान देणा-या स्वच्छतादूतांचा महानगरपालिकेने नेहमीच सन्मान केला आहे. अगदी 1 जानेवारीला संपन्न झालेल्या महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातही महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या हस्ते प्रतिकात्मक रितीने पुरूष आणि महिला स्वच्छतादूतांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
यापुढे जात नवी मुंबई महानगरपालिकेने आता या स्वच्छतादूतांनाच सेलिब्रेटी बनविलेले असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता वाहनांवर 'निश्चय केला - नंबर पहिला' या निर्धार वाक्यासह आठ विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छता कार्यात उत्तम कामगिरी करणा-या स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकविण्यात आलेली आहेत. नवी मुंबई शहर दररोज स्वच्छ राखण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणा-या स्वच्छतादूतांच्या सेवाभावी कार्याचा यामधून गौरव झाल्याने सर्व स्तरांतून पसंती व्यक्त केली जात होत आहे. अशा आगळ्यावेगळ्या प्रकारे स्वच्छतादूतांचा सन्मान करणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे.
महानगरपालिकेच्या लहान-मोठ्या अशा 125 हून अधिक स्वच्छता वाहनांवर दैंनंदिन स्वच्छता राखण्यात उत्कृष्ट कामगिरी करणा-या प्रत्येक विभागातून 1 महिला व 1 पुरूष अशा 16 स्वच्छताकर्मींची छायाचित्रे या वाहनांवर प्रदर्शित करण्यात आली असून याव्दारे चांगल्या कामाचा गौरव केला जात आहे. याशिवाय इतरही स्वच्छताकर्मींमध्ये आपलेही छायाचित्र झळकण्याची जिद्द निर्माण होऊन अधिक चांगले काम करण्याच्या निकोप स्पर्धेतून शहर स्वच्छतेवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
यापुढील काळात 'देशात नंबर वन स्वच्छ शहराचा निर्धार करीत आम्ही सज्ज झालो आहोत, नवी मुंबईकर नागरिकहो आपणही सज्ज व्हा' असा नागरिकांना आवाहन करणारा संदेशच जणू या वाहनांवरील स्वच्छतादूतांच्या छायाचित्रांतून प्रभावी रितीने व्यक्त केला जात आहे.
Published on : 04-01-2021 10:37:49,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update