17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेकरिता नवी मुंबई शहर सज्ज यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणाच्या व्यवस्थेचे स्पेन, चीन, कोलंबिया महिला संघांकडून कौतुक






11 ऑक्टोबरपासून भारतात सुरु झालेल्या “17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 (FIFA U-17 Women’s Football World Cup 2022)” मध्ये नवी मुंबईतील पहिला सामना उद्या 12 ऑक्टोबर रोजी सेक्टर 7, नेरुळ नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये संपन्न होत असून जगभरातील 18 देशांच्या 17 वर्षाखालील महिला फुटबॉल संघांचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई शहर सज्ज झालेले आहे.
नवी मुंबईत सामने खेळण्यासाठी आलेल्या संघांच्या सरावासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर 19ए, नेरुळ येथे विकसित केलेल्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान उपलब्ध करून दिलेले असून त्यामध्ये 8 ऑक्टोबरला सकाळी ते 10 ते 11.30 या वेळेत स्पेनच्या महिला संघाने व सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत चीनच्या महिला संघाने सराव केला. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार या फुटबॉल मैदानात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून पावसाच्या पडणा-या पाण्याचा त्वरीत निचरा होण्याची व्यवस्था याठिकाणी आहे. त्यामुळे मैदानात पाणी थांबून रहात नाही.
8 ऑक्टोबरला सकाळपासून पाऊस असल्याने स्पेनच्या संघ प्रशिक्षकांनी सरावासाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध मैदानांची पाहणी करून त्यामध्ये सरावासाठी प्रथम पसंती देत यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील फुटबॉलल मैदानाची निवड केली व तेथील व्यवस्थेचे कौतुक केले.
अशाच प्रकारे त्याच दिवशी संध्याकाळी चीनच्या संघाने तसेच त्यानंतर 10 ऑक्टोबरला कोलंबियाच्या महिला संघानेही त्याठिकाणी सराव करून मैदानावरील योग्य प्रमाणात असलेली हिरवळ व मैदानाचे व्यवस्थापन याचे कौतुक केले.
फिफाचे सल्लागार आणि मैदान निरिक्षक गॅब्रिअल गल्लेगॉस यांनी मैदानाची पाहणी करून तांत्रिक तपासणी केली. सतत 2 दिवस तीन संघांनी सराव करूनही मैदानाची स्थिती अतिशय उत्तम असल्याचा शेरा त्यांनी नोंदविला. यापुढील काळात डॉ. डी.वाय. स्टेडियममध्ये स्पर्धेत खेळण्यासाठी येणारे आणखी काही देशांचे संघ सरावासाठी याच मैदानाला प्राधान्य देतील असा अभिप्राय त्यांनी दिला.
“17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 (FIFA U-17 Women’s Football World Cup 2022)” यामध्ये दि. 12, 15, 18, 21 व 30 ऑक्टोबर 2022 रोजी प्रत्येक दिवशी 2 अशाप्रकारे नियोजित सामने खेळण्यासाठी जगभरातील विविध देशांच्या महिला फुटबॉलपट्टू येणार असल्याने तसेच विविध देशांतून प्रेक्षकही येणार असल्याने यजमान शहर म्हणून नवी मुंबई सज्ज झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी शहरात मुख्य ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाच्या सुशोभिकरणांतर्गत फुटबॉल खेळाचा प्रचार करणारी भित्तीचित्रे रेखाटण्यात आली आहेत. विविध चौकांमध्ये फुटबॉलच्या शिल्पाकृती साकारण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये पातळीवर विविध उपक्रम आयोजित करून फुटबॉल खेळाची वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई शहर जागतिक महिला फुटबॉलपट्टूंचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले असून डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियम येथील पहिला सामना 12 ऑक्टोबरला सायं. 4.30 वा. मेक्सिको आणि चीन या संघांमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा सामना त्याच दिवशी रात्री 8.00 वा. स्पेन आणि कोलंबिया यांच्यामध्ये रंगणार आहे.
Published on : 11-10-2022 13:17:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update