18 नोव्हेंबर रोजी डॉ. बळीराम गायकवाड उलगडणार क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे सामाजिक समतेचे स्वप्न
थोर क्रांतिकारक आणि अग्रणी समाजसुधारक क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सेक्टर 15, ऐरोली येथे शनिवार, दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी, सायं. 6.30 वा. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या प्रेरणादायी विचारांना अनुसरुन ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेअंतर्गत हा वैचारिक जागर केला जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे भव्यतम व आकर्षक स्मारक बाबासाहेबांच्या जगातील इतर स्मारकांपेक्षा वेगळे असल्याचे अभिप्राय याठिकाणी भेट देणा-या अनेक मान्यवर व्यक्तींनी व नागरिकांनी दिलेले आहेत. स्मारकातील अत्याधुनिक सुविधांसह असलेले सुसज्ज ग्रंथालय व ई - लायब्ररी हा या स्मारकाचा आत्मा असून त्यामुळे हे स्मारक ‘ज्ञानस्मारक’ म्हणून गौरविले जात आहे.
या ज्ञानस्मारकामध्ये ‘विचारवेध’ शिर्षकांतर्गत सातत्याने व्याख्यान परंपरा जपली जात असून याच मालिकेत क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 14 नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या 29 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून अनेक राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय परिषदांमधील नामवंत व्याख्याते, कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम नामदेवराव गायकवाड यांचे विशेष व्याख्यान ‘लहुजी वस्ताद साळवे यांचे सामाजिक समतेचे स्वप्न’ या विषयावर आयोजित करण्यात आलेले आहे. शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 6.30 वा. हे व्याख्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली मुलुंड खाडीपूलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली येथे संपन्न होणार आहे.
दांडपट्टा, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदुकबाजी, निशाणेबाजी अशा विविध युध्दकलांमध्ये निपूण असणा-या लहुजी वस्ताद यांनी स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक निर्मितीचे ध्येय नजरेसमोर ठेवून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी ब्रह्मचारी राहण्याचे ठरविले. त्यांनी शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी पुणे येथे गुलटेकडी परिसरात तालीम युध्द कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु केले. ज्यामध्ये महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके, अप्पासाहेब भंडारकर अशा दिग्गजांसह अनेकांना मल्लविद्येप्रमाणेच शस्त्रास्त्र चालवण्याचेही प्रशिक्षण दिले. सातारा, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, पुणे या भागातील भटक्या विमुक्त बांधवांना एकत्र आणून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीजे पेरण्याचे काम त्यांनी केले. 1857 च्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतीवीर सहभागी होते.
क्रांतिकारक घडविण्यासोबतच सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठीही लहुजीनी पुढाकार घेतला. महात्मा फुले यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या शाळेत स्वत:ची पुतणी मुक्ता हिला दाखल करुन इतरही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी समरसून काम केले. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात लहुजींनी भक्कम पाठींबा दिला व मदतही केली.
अशा सामाजिक चळवळीत अग्रणी असलेल्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्यासारख्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाच्या मनातील सामाजिक समतेचे स्वप्न उलगडण्यासाठी या विषयातील अभ्यासक नामांकित व्याख्याते डॉ. बळीराम गायकवाड हे शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी, सायं. 6.30 वा., भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली-मुलुंड खाडीपूलाजवळ, सेक्टर 15,ऐरोली येथे व्याख्यान देण्यासाठी उपस्थित राहणार असून याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 16-11-2023 11:58:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update