21 फेब्रुवारीला “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत “नवी मुंबई सायक्लॉथॉन 2021”

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जाणीव जागृती करीत लोकसहभागावर भर देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान सुरु करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिका विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवित आहे. या अनुषंगाने नागरिकांनी इंधनावरील वाहनाचा वापर कमी करून पर्यावरणशील वाहनाचा वापर करावा याकरिता "माझी वसुंधरा” अभियानांतर्गत रविवार, दि.21 फेब्रुवारी 2021 रोजी "नवी मुंबई सायक्लॉथॉन 2021” चे आयोजन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आणि कार्यक्रम, उपक्रमांच्या माध्यमातून कलावंत व खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादृष्टीने यावर्षी प्रथमत:च नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने “नवी मुंबई सायक्लॉथॉन 2021" आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबईचा क्विन नेकलेस मानल्या जाणा-या पामबीच रोडवर 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 वाजता "नवी मुंबई सायक्लॉथॉन 2021" ची सुरूवात महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळून होणार असून वाशीच्या दिशेने मोराज सर्कल, सानपाडा इथपर्यंत जाऊन पुन्हा महानगरपालिका मुख्यालय प्रवेशव्दारासमोर सांगता होणार आहे.
11 वर्षावरील नागरिकांसाठी सायक्लोथॉनमध्ये सहभाग खुला असून यामध्ये सहभागी होऊ इच्छिणा-या व्यक्तींनी https:/forms.gle/GHZv1ACGXaxArepj7 या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचे आहे. सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक व्यक्तीला माझी वसुंधरा अभियानाचे आकर्षक टी-शर्ट व कॅप महानगरपालिकच्या वतीने देण्यात येणार आहे. तरी नोंदणी झालेल्या व्यक्तींनी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.00 वाजता महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रारंभ स्थळाठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच सायक्लॉथ़ॉन पूर्ण करणा-या सहभागींना मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या "नवी मुंबई सायक्लॉथॉन 2021" करिता कोविड-19 विषयक मार्गदर्शक तत्वाचे पालन करत यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 05-02-2021 10:28:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update