215 स्वच्छताकर्मी व कुटुंबियांनी घेतला दंतचिकित्सा शिबिराचा लाभ
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नवी मुंबईकर नागरिकांचा नेहमीच महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. यामध्ये नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थाही स्वयंस्फुर्तीने सहभागी होत असतात.
अशाच प्रकारचा एक दंतचिकित्सा शिबिराचा अभिनव उपक्रम भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ऐरोली येथील स्टेमआरएक्स हॉस्पिटलमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगातून 15 व 16 ऑगस्ट असा दोन दिवस राबविण्यात आला. 215 स्वच्छता कर्मी व त्यांच्या कुटुंबीयांनी या विनामूल्य शिबिराचा लाभ घेऊन आपली दंतचिकित्सा करून घेतली.
या दंतचिकित्सा शिबिराच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्टेमआरएक्स रुग्णालयाने पुढाकार घेत स्वच्छताकर्मींकरिता दंतचिकित्सा शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा केलेला प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे सांगितले. तपासणीनंतर टूथ क्लिनिंगही केले जात असल्याने स्वच्छताकर्मींचे हसणे अधिक उजळले असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या दंतचिकित्सा शिबिरामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहील असा विश्वासही डॉ. बाबासाहेब राजळे यांनी व्यक्त केला.
शिबिराचे आयोजक स्टेम आरएक्स रुग्णालयाचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांनी या शिबिराच्या माध्यमातून शहराच्या स्वच्छतेचे रक्षण करणाऱ्या स्वच्छता रक्षकांची सेवा करण्याची संधी आम्हांला उपलब्ध करून दिली त्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे आभार मानले. यापुढील काळातही स्वच्छताकर्मींसाठी जे जे शक्य होईल ते ते करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिद्धांत महाजन यांनी सामाजिक कार्यासाठी आम्ही यापुढील काळातही पुढाकार घेऊ असे सांगत शिबिराला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.
या दोन दिवसीय शिबिरात 215 स्वच्छताकर्मीं आणि त्यांच्या कुटुंबियांनी दंतचिकित्सा करून घेतली. चिकित्सेनंतर त्यांच्या दातांची मोफत स्वच्छत करून देण्यात आली. यामधील 22 व्यक्तींना पुढील उपचाराची गरज असल्याचे निदान निघाले, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर, स्वच्छता अधिकारी श्री. सुभाष म्हसे व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. स्वच्छताकर्मींविषयी आपुलकी दाखवत स्टेम आरएक्स रुग्णालय ऐरोली यांनी पुढाकार घेत आयोजित केलेल्या दंतचिकित्सा आरोग्य उपक्रमाचा लाभ स्वच्छतामित्रांनी आपल्या कुटुंबियांसह मोठ्या प्रमाणावर घेतला.
Published on : 21-08-2023 08:03:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update