24 नोव्हेंबरला निसर्गोद्यानात 8 हजारहून अधिक विद्यार्थी, नागरिक रेखाटणार चित्रमय स्वच्छता संकल्पना
'स्वच्छ सर्वेक्षण 2023' ला सामोरे जाताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांचा स्वच्छता कार्यात सहभाग घेतला जात असून अशाच प्रकारची स्वच्छता विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे सेक्टर 14 येथील निसर्गोद्यानात 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 8 हजाराहून अधिक विद्यार्थी, नागरिक एकत्र येऊन नवी मुंबईचे स्वच्छता चित्र रेखाटतील अशी अपेक्षा आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेस लाभला असून यामध्ये नागरिकांच्या प्रत्येक उपक्रमातील स्वयंपूर्ण सहभागाचा मोठा वाटा राहिला आहे. नागरिकांच्या स्वच्छता विषयक विविध संकल्पनांना मुक्त वाव मिळावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध कलात्मक स्पर्धा उपक्रमांचे आयोजन केले आहे.. नुकत्याच झालेल्या भित्तीचित्र स्पर्धेलाही चित्रकारांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
अशाच प्रकारची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागाकरिता स्पर्धा स्थळी येऊन (1) माझे शहर – माझा सहभाग. (2) प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि (3) 3R (Reduce, Reuse, Recycle) या 3 पैकी एका विषयावर चित्र काढावयाचे आहे. चित्र काढण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कागद देण्यात येणार असून त्यासाठी लागणारे रंग व साहित्य स्पर्धकाने स्वत: आणावयाचे आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चित्रांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी, नागरिक चित्रकारांनी सेक्टर 14 कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानासारख्या आकर्षक स्थळी येऊन निसर्गरम्य वातावरणात आपल्या मनातील स्वच्छता विषयक संकल्पनांची चित्ररुपात मांडणी करावी व हा उपक्रम यशस्वी करून स्वच्छ नवी मुंबई मिशनमध्ये जागरुक स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक म्हणून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 22-11-2022 14:45:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update