25 नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे भारतीय संविधानाविषयी वैचारिक जागर
सेक्टर 15 ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तेथील संपन्न ग्रंथालय, चरित्रचित्र दालन तसेच वैशिष्टपूर्ण सुविधांमुळे एक आगळेवेगळे स्मारक असल्याचे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व त्याठिकाणी भेट देणा-या हजारो नागरिकांनी व्यक्त केले आहे.
‘ज्ञान हिच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचारप्रणालीवर आधारित स्मारकात संपन्न झालेल्या विविध उपक्रमांमुळे स्मारकाच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडलेली आहे. याठिकाणी ‘विचारवेध’ तसेच ‘जागर’ या शृंखलेंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांनाही श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
याच धर्तीवर दि. 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त स्मारकाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संविधानविषयक ‘निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धा’ यापूर्वीच घोषित करण्यात आली असून त्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे.
त्याचप्रमाणे संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 25 नोव्हेंबर रोजी सुप्रसिध्द लेखक व संविधान अभ्यासक श्री. सुरेश सावंत यांचे ‘माझे संविधान - माझा अभिमान’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सायं. 6 वा. या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले असून याप्रसंगी संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. याच दिवशी सकाळी 10 वा. पासून प्राथमिक शालेय व माध्यमिक शालेय गटातील उपांत्य फेरीतून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांची अंतिम फेरी घेण्यात येणार आहे.
संविधान विषयक आपल्या मनात असलेला आदर व त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 25 नोव्हेंबर 2022 रोजी, सायं. 6 वा. स्मारकात संपन्न होणा-या विशेष व्याख्यानाप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानातील मूलतत्वांचा जागर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 21-11-2022 14:30:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update