26,133 नवी मुंबईकर नागरिकांनी एका दिवसात वंडर्स पार्कमध्ये घेतली स्वच्छतेची डिजीटल शपथ



इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले असून यामध्ये व्यापक लोकसहभागावर भर दिला आहे. रविवारी 17 सप्टेंबरला आठही विभागांमध्ये नऊ ठिकाणी सामुहिक स्वच्छता शपथ हा उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविण्यात आला ज्यामध्ये 1 लक्ष 14 हजार हून अधिक विदयार्थी, युवक व नागरिकांनी सहभागी होत नवी मुंबईच्या स्वच्छता विषयक जागरुकतेचे व एकात्मतेचे विशाल दर्शन घडविले.
अशाच प्रकारे आजच्या डिजीटल युगाला साजेसा अभिनव उपक्रम नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क येथे राबविण्यात आला. या ठिकाणी एका दिवसात 26 हजार 133 नागरिकांनी स्वच्छतेची डिजीटल शपथ घेत स्वच्छ शहराविषयी असलेली आपली बांधिलकी प्रदर्शित केली.
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये ‘कचरामुक्त भारत’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवून कचरामुक्त शहरांच्या उभारणीत प्रामुख्याने तरुणाईला सहभागी करुन घेत कचऱ्याविरोधात युवकांची लढाई (Youth V/S Garbage) या घोषवाक्यानुसार नव्या पिढीत स्वच्छतेचे महत्व रुजविले जात आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका युवक सहभागावर भर देत विविध उपक्रम राबवित आहे.
अशाच प्रकारे वंडर्स पार्क येथे अभिनव स्वरूपात ‘स्वच्छतेची डिजीटल शपथ’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना या उपक्रमात सहभागी होणे सोयीचे व्हावे याकरिता वंडर्स पार्कमध्ये सकाळी 7.00 ते रात्री 10.00 या वेळेत ‘एक दिवसाकरिता विनामूल्य प्रवेश’ जाहीर करण्यात आला होता. यावेळी डिजीटल शपथ घेतल्यानंतर नागरिकांना पाण्याच्या कारंज्यावरील लेझर शो दाखविण्यात आला. हजारो नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या ठिकाणी भेट देऊन मुलाबाळांसह वंडर्स पार्कच्या सफरीचा आनंद घेतला.
डिजीटल शपथ घेण्यासाठी या ठिकाणी 10 डिजीटल उपकरणे ठेवण्यात आली होती. त्या उपकरणांवर असलेल्या हाताच्या पंजाच्या रेखाकृतीवर नागरिकांनी आपल्या हाताचा पंजा ठेवल्यानंतर समोरच्या एलईडी स्क्रिनवर शपथेचा मजकूर प्रदर्शित होत होता त्यामध्ये – मी माझ्या घरात कचऱ्याचे वर्गीकरण करेन, एकल वापराच्या प्लास्टिकचा मी उपयोग करणार नाही, मी माझा परिसर आणि माझे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संपूर्ण योगदान देईन. ही शपथ घेतल्यानंतर डिजीटल स्क्रिनवर धन्यवाद संदेश येऊन आपण नवी मुंबई इको नाइट्स संघाचे अमुक अमुक क्रमांकाचे सदस्य आहात ही संख्या प्रदर्शित होत होती. अशा प्रकारे एका दिवसात सकाळी 7.00 ते रात्री 10.00 या वेळेत 26 हजार 133 नागरिकांनी डिजीटल शपथ घेऊन नवी मुंबई इको नाइट्स संघात सदस्य म्हणून आपला सहभाग नोंदविला.
मागील वर्षी इंडियन स्वच्छता लीगमध्ये सर्वाधिक युवक सहभागाबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविणारे शहर म्हणून मानांकन प्राप्त नवी मुंबई महानगरपालिका यावर्षीही हाच नावलौकिक कायम राखण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून सुप्रसिध्द संगीतकार, गायक तथा स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन यांच्या नेतृत्वाखाली ‘नवी मुंबई इको नाईट्स’ हा संघ स्थापन करुन सज्ज झाली आहे. या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जात असून डिजीटल स्वच्छता शपथेचा हा नव्या माहिती तंत्रज्ञान युगाला साजेसा उपक्रम 26 हजारहून अधिक नागरिकांनी डिजीटल शपथ घेऊन यशस्वी केला.
Published on : 25-09-2023 15:38:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update