28 हजाराहून अधिक गरजू, निराधार, बेघरांना दररोज केले जाते अन्नपदार्थांचे वितरण

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला असून या काळात गरजू मजूर, कामगार, विस्थापित कामगार, बेघर नागरिक यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. या संकटग्रस्त लोकांची काळजी घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दररोज 8 कम्युनिटी किचनव्दारे तसेच काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्या सहयोगाने 27 ते 28 हजार नागरिकांना दररोज दुपारी व रात्री दोन वेळेचे जेवण दिले जात आहे.
याबाबत अगदी सुरूवातीपासूनच महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सुयोग्य नियोजन करीत महापालिका क्षेत्रात एकूण 18 ठिकाणी 1850 हून अधिक नागरिकांच्या निवा-याची नियोजन व्यवस्था केलेली आहे. त्यामधील 5 ठिकाणी सध्या 172 नागरिक असून त्यात नमुंमपा शाळा क्र. 01, बेलापूर निवारा केंद्र येथे 31, नमुंमपा निवारा केंद्र, आग्रोळी, से.11, बेलापूर येथे 20, नमुंमपा शाळा क्र. 6, से. 6, सारसोळे, नेरूळ येथे 12, नमुंमपा निवारा केंद्र, घणसोली येथे 48, नमुंमपा शाळा क्र. 102, से. 14, ऐरोली येथे 61 अशा 172 नागरिकांना तसेच तहसिलदारांमार्फत आपापल्या गांवी चालत निघालेल्या 217 स्थलांतरित कामगारांना सिडको एक्झिबिशन सेंटर, से.30, वाशी निवारा केंद्र याठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. या 389 स्थलांतरित कामगार, बेघरांची निवारा आणि भोजन व्यवस्था नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काही ठिकाणी महानगरपालिकेच्या कम्युनिटी किचनव्दारे तर काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
या इतक्या मोठ्या प्रमाणावरील दररोजच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी 15 ठिकाणी कम्युनिटी किचनची व्यवस्था करण्यात आलेली असून त्यापैकी सद्यस्थितीत गुरूव्दारा सेक्टर 8 सीबीडी बेलापूर ( 4110 व्यक्तींचे दोन वेळचे जेवण), गुरूव्दारा, सेक्टर 19 नेरूळ (2924 व्यक्तींचे दोन वेळचे भोजन), दगडखाण क्षेत्रातील नागरिकांसाठी विश्व बाल केंद्र महात्मा गांधी नगर एमआयडीसी शिरवणे ( 400 व्यक्तींचे दोन वेळचे जेवण), गायत्री चेतना केंद्र सेक्टर 4 सानपाडा (2800 व्यक्तींचे दोन वेळचे जेवण), महालक्ष्मी मंदीर ट्रस्ट सेक्टर 14 कोपरखैरणे (2800 व्यक्तींचे दोन वेळचे जेवण), राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आंबेडकरनगर रबाळे ( 5260 व्यक्तींचे दोन वेळचे जेवण), इच्छापूर्ती गणेश मंदिर सेक्टर 15 ऐरोली ( 2000 व्यक्तींचे दोन वेळचे जेवण), प्रबोधनकार ठाकरे विद्यालय इलठणपाडा दिघा (1200 व्यक्तींचे दोन वेळचे जेवण) या आठ ठिकाणची कम्युनिटी किचन सुरू करण्यात आलेली आहेत.
या जेवणामध्ये पुरी - भाजी अथवा भाजी - चपाती, डाळ - भात अथवा दालखिचडी, बिर्याणी अथवा पुलाव अशाप्रकारे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे जेवण सकाळी व रात्री दोन वेळा पुरविण्यात येत आहे. 27 मार्चपासून 19 एप्रिलपर्यंत 2 लक्ष 92 हजार 533 अन्नपदार्थांचे पॅकेट्स वितरित करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेकडे विविध सेवाभावी संस्था / दानशूर नागरिक यांच्याकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्य स्वरूपातील मदतीतून सद्यस्थितीत जेवण बनविण्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात येत आहे. हा पुरवठा संपल्यानंतर जिल्हाधिकारी, ठाणे यांनी नोडल ऑफिसर म्हणून नेमलेल्या तहसिलदार यांच्याकडून अन्नधान्य पुरवठ्याचे शासनामार्फत नियोजन करण्यात येईल व महानगरपालिका अन्नपदार्थ तयार करणे व त्यांचे सुनियोजनित वितरण करण्याची कार्यवाही पार पाडेल.
अन्नधान्य पुरवठा, जेवण तयार करणे व त्याचे विभागवार वितरण करणे या संपूर्ण कार्यवाहीच्या सुयोग्य नियोजनाकरीता महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या नियंत्रणाखाली विशेष सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली असून अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्यासह उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व श्री. नितीन काळे याबाबतच्या समन्वयाचे काम करीत आहेत. अन्नधान्य साठा करणे, त्याच्या नोंदी करणे व त्याचे गरजेनुसार सुव्यवस्थित वितरण करणे याकरिता तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त श्री. समीर जाधव यांचेकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अन्नधान्य व इतर साहित्य सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचेकडून संकलित करण्याची जबाबदारी इटीसी केंद्र संचालक श्रीम. वर्षा भगत पार पाडीत आहेत. हे अन्नधान्य व भोजन योग्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याकरिता विभाग पातळीवर नियंत्रक अधिकारी व प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
याशिवाय 29 हजार 669 आत्यंतिक गरजू व दिव्यांग नागरिकांना अन्धान्याची पाकीटे वितरित करण्यात आली असून या अन्न्धान्य किट्समध्ये 3 किलो तांदूळ, 5 किलो चक्की फ्रेश गव्हाचे पीठ, 1 किलो तूरडाळ, 1 किलो साखर, 1 किलो मीठ व 1 किलो तेल अशा जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे.
या उपक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती स्वयंस्फुर्तीने पुढे आल्या असून या सहकार्याबद्दल महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी अडचणीच्या काळात माणुसकीचे दर्शन घडविणा-या या सेवाभावी संस्था, व्यक्तींचे कौतुक करीत आभार मानले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणा-या गरजू, मजूर, कामगार, विस्थापित कामगार, बेघर नागरिक तसेच ज्यांची काळजी घेण्यास कोणी नाही अशा दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांची काळजी घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काही ठिकाणी सेवाभावी संस्थांच्या सहयोगाने दररोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळा जेवण पुरवठा करण्यात येत आहे. अशाप्रकारे कोरोनाच्या संकटात गरजू, निराधार, बेघरांना दिलासा देणा-या या माणुसकी जपणा-या उपक्रमाबद्दल महानगरपालिकेला धन्यवाद देण्यात येत आहेत.
Published on : 20-04-2020 13:20:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update