31 ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येतील नमुंमपा प्रारुप विकास योजनेबाबत सूचना / हरकती
नवी मुंबई महानगरपालिकेची प्रारूप विकास योजना ही महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 (यापुढे याचा उल्लेख “उक्त्ा अधिनियम” असा केलेला असेल) चे कलम 26(1) अन्वये तयार करून जनतेकडून सूचना व हरकती मागविणेसाठी प्रसिद्ध केलेली असून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात व स्थानिक वृत्तपत्रामध्ये दिनांक 10/08/2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तसेच त्याबाबतचे शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक 25/08/2022 रोजी व स्थानिक वृत्तपत्रात दिनांक 02/09/2022 रोजी प्रसिद्ध झालेले आहे.
या अधिनियमातील कलम 26(1) मध्ये नमूद केल्यानुसार सूचना / हरकती दाखल करण्यासाठी निर्धारित कालावधी 60 दिवसांचा आहे. त्यानुसार वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांक 02/09/2022 रोजीच्या शुध्दीपत्रकापासून सूचना / हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक 31/10/2022 असा आहे.
याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिका प्रारूप विकास योजनेबाबत काही हरकती / सूचना असल्यास मा.आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे त्या लेखी स्वरूपात पाठवाव्यात. सदर हरकती / सूचना नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुख्य टपाल कक्ष तसेच सहायक संचालक, नगररचना यांचे कार्यालय व सर्व विभाग कार्यालये येथे स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 10-10-2022 13:35:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update