4 वाजल्यानंतर आस्थापना सुरु ठेवल्याने 2 दुकाने सील व 5 रेस्टॉरंट बार कडून प्रत्येकी रु.50 हजार दंड


महाराष्ट्र शासनाच्या 'लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र' आदेशाची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी करून कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकडे विशेष दक्षता पथकांच्या माध्यमातून बारकाईने लक्ष दिले जात आहे. शहरातील पॉझिटिव्हीटीचे प्रमाणे आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्धता या आधारावर 5 स्तर निश्चित करून कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून तिस-या स्तरामध्ये असणा-या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 विशेष दक्षता पथकांनी विशेष कारवाई करीत मागील 1 महिन्याच्या कालावधीत 3733 व्यक्ती / दुकानदार यांच्याकडून 16 लक्ष 77 हजार 400 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.
कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या स्तर 3 मधील प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार दुकाने / आस्थापना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तथापि त्यानंतरही दुकाने / आस्थापना सुरु ठेवणा-यांविरोधात धडक कारवाई कऱण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने / आस्थापना 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास पहिल्या वेळेस रु.10 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल तसेच रेस्टॉरंट / बार / पब 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास रु.50 हजार इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नियमांचे दुस-या वेळेस उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना 7 दिवसांकरिता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे तिस-या वेळेस नियमांचे उल्लंघन केल्यास सदर आस्थापना कोरोना महामारीची अधिसूचना संपुष्टात येईपर्यत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद आहे.
सदर नियमांचे पालन होत असल्याबाबत विशेष दक्षता पथकांमार्फत बारकाईने लक्ष देण्यात येत असून पहिल्या वेळेस रु.10 हजार दंड भरूनही पुन्हा दुस-यांदा जाहीर वेळेनंतरही दुकान सुरु ठेवून नियमांचे उल्लंघन करणा-या सेक्टर 6 ऐरोली येथील गुरुकृप जनरल स्टोअर्स व यश सुपरमार्केट या 2 दुकानांवर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहितेमधील कलम 188 नुसार दुकान सिलबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे तुर्भे जनता मार्केट येथे रात्री सुरु असणा-या रमेश रेस्टॉरंट व बार आणि द किंग बार या दोन आस्थापनांकडून प्रत्येकी रु.50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आलेली आहे.
तसेच बेलापूर विभागातील विशेष दक्षता पथकांनी सेक्टर 15 येथील स्टार सिटी बार, आरूष रेस्टॉरंट व बार आणि सेक्टर 11 येथील मेघराज रेस्टॉरंट व बार या 3 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी रु.50 हजार इतका दंड वसूल केलेला आहे.
कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून त्याचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिक / आस्थापना यांनी कोव्हीड अनुरूप वर्तन (Covid Appropriate behaviour) ठेवून कोव्हीडचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 07-07-2021 14:53:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update