5 हजारहून अधिक महिला, विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेत ‘स्वच्छता संग्राम रॅली’तून केला स्वच्छतेचा जागर
महिला कोणतेही काम अत्यंत जबाबदारीने करतात. स्वच्छतेमध्ये तर महिलाच आघाडीवर असतात. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेला स्वच्छोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वच्छता संग्राम रॅलीत एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचे व मुलींचे कौतुक करीत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई शहर महाराष्ट्रात नंबर वन आहेच आता आपला उत्साह पाहून देशातही आपण नक्कीच नंबर वन होऊ असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छोत्सव 2023’ अंतर्गत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून व प्रमुख उपस्थितीत 5 हजाराहून महिला व विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी केलेल्या ‘स्वच्छता संग्राम रॅली’प्रसंगी आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्वच्छतेचे आरोग्याशी असलेले नाते सांगत केंद्र सरकारने कचरामुक्त शहरांचे अभियान राबविताना ‘स्वच्छोत्सव 2023’ आयोजित करून महिलांचे स्वच्छता कार्यातील महत्व अधोरेखित केले असल्याचे सांगितले. ‘स्वच्छोत्सव 2023’ च्या अनुषंगाने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत नवी मुंबईतील ‘झिरो वेस्ट बँक’, ‘ग्रो विथ म्युझिक’ आणि ‘गेमिंग झोन बिलो फ्लायओव्हर’ या तिन्ही नाविन्यपूर्ण उपक्रमांचे देश पातळीवर कौतुक झाल्याचे सांगत 5 हजाराहून अधिक महिला आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी केलेल्या या ‘स्वच्छता संग्राम रॅली’चीही विशेष दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल असा विश्वास व्यक्त केला.
स्वच्छता कार्यातील महिलांचा सहभाग आणि त्यांचे नेतृत्व वृध्दींगत व्हावे यादृष्टीने ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देश पातळीवर ‘स्वच्छोत्सव 2023’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या अनुषंगाने कचरामुक्त शहरांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने शून्य कचरा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता संग्राम रॅली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 5 हजारहून अधिक महिला व विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छ, सुंदर, पर्यावरणशील नवी मुंबईचा एकमुखाने गौरव केला.
याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, डॉ. श्रीराम पवार, श्रीम. मंगला माळवे, श्री. अंनत जाधव, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे, श्री. अजय संख्ये, श्री. प्रवीण गाढे, श्रीम. शुभांगी दोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने यावर्षीच्या सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ‘निश्चय केला, नंबर पहिला’ म्हणत नागरिकांच्या सहयोगाने त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.
सेक्टर 26, नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात सायं. 4.30 वाजल्यापासूनच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला संस्था, मंडळे, बचत गट यांच्या महिला प्रतिनिधी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विद्यार्थी यांची एकत्र जमायला सुरूवात झाली होती. बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी झेंडा दाखविल्यानंतर आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीचे नेतृत्व करणा-या ‘लेट्स सेलिब्रेट फिटनेस’ सेवाभावी संस्थेच्या प्रमुख श्रीम. रिचा समीत यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
गणपतशेठ तांडेल मैदानापासून सुरु झालेली ही 5 हजाराहून अधिक सहभागी महिला व विद्यार्थिनी, विद्यार्थी यांची ही ‘स्वच्छता संग्राम रॅली’ डी मार्ट समोरून सेक्टर 40, 42 मधील रस्त्याने सिवूड ग्रॅंड सेंट्रल मॉल मार्गे नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे पोहचली. या रॅलीमध्ये स्वच्छता संदेशांचे फलक झळकवित स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा दमदार प्रचार करण्यात आला. त्यासोबतीने कचरा वर्गीकरण, कच-याची विल्हेवाट, प्लास्टिक वापराला प्रतिबंध अशा स्वच्छताविषयक विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.
रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून रॅलीला सलामी दिली. अनेकजण काही काळ रॅलीत सहभागीदेखील झाले. अत्यंत शिस्तबध्द रितीने नवी मुंबई वाहतुक पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करीत रॅली मार्गस्थ होत असल्याने वाहतुकीला कुठेही अडथळा जाणवला नाही. नवी मुंबई पोलीस तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी स्वयंसेवक रॅलीच्या सुनियोजितपणासाठी दक्ष होते.
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे रॅलीची सांगता होत असताना ‘ओलू, सुकू व घातकू’ या कचरा वर्गीकरणाविषयी हसतखेळत संदेश देणा-या आरंभ क्रिएशन्स प्रस्तुत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याला उपस्थितांची उत्तम दाद मिळाली. मान्यवरांनी याठिकाणी शु्भेच्छा देत मार्गदर्शन केले.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यासमवेत आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्यासह सर्व मान्यवरांनी आणि उपस्थित हजारो महिला व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. उपस्थित सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करून हात उंचावून हलवत स्वच्छतायात्री बनून नवी मुंबईला देशात नंबर वन बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. निसर्गरम्य वातावरणात या प्रकाश शलाका आसमंतात झळकत असतानाचे चित्र अत्यंत विलोभनीय होते.
स्वच्छोत्सवाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात स्वच्छताविषयक उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिला तसेच संस्थांचा ‘विन्स अर्थात वुमेन आयकॉन लिडींग स्वच्छता 2023’ हा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. याकरिता 5 एप्रिलपर्यंत आपले नामांकन दाखल करावयाचे असून याबाबतची सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर पेजवर उपलब्ध आहे. यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.
‘स्वच्छोत्सव 2023’ च्या अनुषंगाने महिलांचे स्वच्छतेमधील अनमोल योगदान लक्षात घेत त्यांच्या स्वच्छता कार्याचा यथोचित सन्मान करीत नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेली ही ‘स्वच्छता संग्राम रॅली’ 5 हजाराहून अधिक महिला, विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वच्छतेचा जोरदार जागर करीत यशस्वी केली.
Published on : 03-04-2023 06:49:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update