5 डिसेंबरला ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. दिलीप मंडल वाहणार वैचारिक आदरांजली
नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे अल्पावधीतच बाबासाहेबांच्या 'ज्ञान हीच शक्ती' या विचारांवर आधारलेले आगळेवेगळे 'ज्ञानस्मारक'' म्हणून नावाजले जात आहे. देशापरदेशातील अनेक मान्यवरांनी, अभ्यासकांनी व नागरिकांनी या स्मारकाला भेट देऊन येथील वेगळेपणाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.
5 डिसेंबर 2021 रोजी महानगरपालिकेच्या या स्मारकातील सुविधांचे लोकार्पण तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले होते. तेव्हापासून मागील दोन वर्षात विविध स्तरांतील 2 लाखांहून अधिक नागरिकांनी या स्मारकाला भेट देऊन 'अविस्मरणीय, धन्य झालो, भारावून गेलो' अशा भावना उत्स्फूर्त प्रतिक्रियांद्वारे व्यक्त केल्या आहेत.
स्मारकामधील 5 हजारहून अधिक ग्रंथसंपदा व ऑडिओ - व्हिडिओ लायब्ररीसह ग्रंथालय सुविधा अभ्यासकांना व पुस्तकप्रेमींना अक्षर मेजवानी असून त्या सोबतीनेच दर महिन्यात 'विचारवेध' शृंखले अंतर्गत होणारी विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने हा देखील श्रोत्यांसाठी वैचारिक खजिना आहे. या व्याख्यानांना होणारी गर्दी पाहून नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात इतक्या आत्मीयतेने वैचारिकता जपली जात असल्याबद्दल व्याख्यात्यांनी व मान्यवरांनी वेळोवेळी प्रशंसा केली आहे.
याच धर्तीवर दि. 5 डिसेंबर रोजी स्मारकातील सुविधा लोकार्पणाला दोन वर्षे पूर्ण होत असताना, त्या सोबतच 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या सदोदित प्रेरणादायी स्मृतींना वैचारिक आदरांजली अर्पण करीत, महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला रविवार, दि. 5 डिसेंबर 2023 रोजी, 'विचारवेध' या व्याख्यान शृंखलेंतर्गत सायं. 6.30 वा. सुप्रसिद्ध विचारवंत व लेखक श्री. दिलीप मंडल यांचे, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर और राष्ट्र निर्माण' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली जाणारी ही वैचारिक आदरांजली सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. दिलीप मंडल यांच्या तोंडून प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी रविवार, 5 डिसेंबर 2023 रोजी सायं. 6.30 वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सभागृह, मुलुंड - ऐरोली खाडी पुलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली, नवी मुंबई येथे आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे ऐरोली, नवी मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे इतर कोणत्याही स्मारकांपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व वेगळे असे स्मारक असून या ठिकाणी असलेले ई लायब्ररीसह पुस्तकांनी संपन्न ग्रंथालय, बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्रातून जीवनदर्शन घडवणारे विशेष दालन, बाबासाहेबांच्या भाषणाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा होलोग्रफिक प्रेझेंटेशन शो, अभिनव भव्यतम ध्यानकेंद्र या साऱ्या सुविधांचा अनुभव घेत बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर रोजीही चैत्यभूमीप्रमाणेच ऐरोली येथील स्मारकालाही आवर्जून भेट द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Published on : 06-12-2023 14:33:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update